भुसावळ नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत २८ रोजी सुनावणी | पुढारी

भुसावळ नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत २८ रोजी सुनावणी

जळगाव, पुढारी वृत्तसेवा

भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नऊ नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर जिल्हा प्रशासनाकडे २८ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

गेल्या महिन्यात १७ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भुसावळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह अमोल इंगळे, लक्ष्मी रमेश मकासरे, सविता रमेश मकासरे, प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे, मेघा देवेंद्र वाणी, ॲड. बोधराज दगडू चौधरी, शोभा अरुण नेमाडे, किरण भागवत कोलते व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे या ९ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवकांनी २०१६ साली झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणून लढवून विजय संपादन केला होता. पंचवार्षिक संपण्यासाठी काही दिवस उरले असतांना त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्षांतर बंदीच्या नियमानुसार या सर्वांना अपात्र करण्यात यावे या मागणीचा अर्ज भाजपच्या नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केला असून यावर जिल्हाधिकारी कार्यालयात १४ जानेवारी रोजी सुनावणी झाली.

याप्रसंगी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या वतीने संबंधित ९ नगरसेवकांनी ॲड. हरिश पाटील व ऍड. महेश भोकरीकर यांनी आपल्या पक्षकारांचे म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. त्यानुसार २८ जानेवारी रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

आगामी नगरपालिका निवडणुकीआधी पालिकेतील राजकीय वातावरण तापण्यास प्रारंभ झाल्याचे दिसून येत आहे. यातच आता पक्षांतर करणाऱ्यांच्या विरोधात अर्ज दाखल करण्यात आल्याने यावर नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा

Back to top button