Ambarnath Municipal Politics: अंबरनाथ–अकोटमध्ये भाजप–काँग्रेस आघाड्यांवर हायकमांडची कात्री

सत्तेसाठी झालेल्या स्थानिक तडजोडींना ब्रेक; काँग्रेसची निलंबनाची कारवाई, भाजपकडूनही आघाडी मोडीत
BJP
BJPPudhari
Published on
Updated on

मुंबई/अंबरनाथ/अकोला : राजेश जगताप

भारतीय जनता पक्षाने अंबरनाथ आणि अकोल्याच्या अकोटमध्ये काँग्रेस आणि एआयएमआयएम या दोन कट्टर शत्रूंशी आघाडी केल्याचे उघड होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत ही आघाडी मान्य नाही, ती तत्काळ तोडा, असे आदेश भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी हे आदेश देण्याच्या आधीच प्रदेश काँग्रेसनेही भाजपशी आघाडी करणारी अंबरनाथमधील कार्यकारिणीच बरखास्त करून टाकली आणि 12 नगरसेवक निलंबित केले.

BJP
शरद पवारांना एनडीएत आणण्यास आता अजित पवार यांचा पुढाकार?

काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. काँग्रेस आणि एमआयएमसोबत युती होऊच शकत नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झाले असले तरी चुकीचेच आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल, असे देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

BJP
70000 crore dispute | सत्तर हजार कोटींच्या वादात तटकरेंची मध्यस्थी

अंबरनाथ आघाडीत भाजप-काँग्रेस

नगरपालिका निवडणुकांपासून राज्यात निरनिराळी राजकीय समीकरणे उदयास आली. मात्र आपल्या कट्टर शत्रूंशी भाजपने कुठेही जुळवून घेतले नाही. आता महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू असताना मात्र अंबरनाथमध्ये 27 नगरसेवकांसह सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपने आपल्या 14 नगरसेवकांसह काँग्रेसला सोबत घेत आघाडी स्थापन केली. या आघाडीत काँग्रेसचे 12 नगरसेवक, अजित पवार गटाचे 4 नगरसेवक आणि 1 अपक्ष अशी मोट बांधली गेली. ही आघाडी स्थापन झाल्याचे पत्रही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना गटनेता म्हणून अभिजीत गुलाबराव करंजुळे पाटील यांच्या सहीने देण्यात आले. अंबरनाथच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा हे दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे होते. मागील तीस वर्षांत प्रथमच इथे शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला व भाजपाच्या तेजश्री करंजुले पाटील या काँग्रेसच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या.

BJP
Municipal Corporation Election | दोन्ही राष्ट्रवादीसमोर अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान

शिवसेना विरोधी बाकावर

उपमुख्यमंत्री शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सत्तासंघर्षात गटनेतेपद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेसला सोबत घेत अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली. शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी (अजित पवार गट) व एक अपक्ष असे एकूण 59 नगरसेवकांपैकी 31 नगरसेवक आपल्या गटात सामील केले. त्यामुळे सर्वात जास्त नगरसेवक निवडून येऊन देखील शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.

BJP
Mundhwa land scam | मुंढवा जमीन खरेदी-विक्री हा घोटाळाच : मुख्यमंत्री फडणवीस

12 जानेवारीला काय?

काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी आपल्या सोबत 12 नगरसेवकांचा वेगळा गट तयार केला आहे. त्यामुळे पक्षातून निलंबित झाले असले तरी त्यांनी आपला गट भाजपासोबत विलीन करण्याचे ठरवले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. येत्या 12 जानेवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे निलंबित 12 नगरसेवक भाजपामध्ये विलीन होतील की, वेगळा निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी पत्र काढून निवडून आलेल्या काँग्रेसच्या बारा नगरसेवकांना निलंबित केल्याने त्यांना भाजपामध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे म्हटले जाते.

BJP
Missing fisherman Back alive: समुद्रात बेपत्ता खलाशी पाच दिवसांनी जिवंत परतला

अकोटमध्ये सारेच एकत्र

अकोट नगरपरिषदेतही भाजपने अकोट विकास मंच स्थापन करून त्यात भाजपनंतर सर्वाधिक पाच जागा जिंकणाऱ्या एआयएमआयएमला (ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन) सोबत घेतले. या मंचामध्ये शिवसेनेचे उद्धव आणि शिंदे हे दोन्ही गट आहेत हे विशेष. जोडीला शरद पवार आणि अजित पवारांचेही दोन्ही गट आले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडूदेखील या विकास मंचामध्ये सहभागी झाले. या विकास मंच स्थापनेचे पत्र मंगळवारीच अकोला जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर हे गटनेते असतील असे त्यात नमूद आहे. याचा अर्थ या अकोट विकास मंचात सहभागी पक्षांच्या सर्व नगरसेवकांना रवी ठाकूर यांचे आदेश मानावे लागतील. 13 जानेवारीला होणाऱ्या उपाध्यक्षपदाच्या आणि स्वीकृत सदस्य निवडीच्या प्रक्रियेत ठाकूर यांचाच व्हीप चालणार होता.

BJP
Devendra Fadnavis : काँग्रेस, ‘MIM’सोबतची युती अमान्य : CM देवेंद्र फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

प्रदेश काँग्रेसची कारवाई

अंबरनाथ आणि अकोट या दोन्ही ठिकाणी केवळ सत्तेसाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केलेल्या तडजोडी प्रदेश काँग्रेसने फेटाळल्या. भाजप आणि काँग्रेसमध्ये युती होण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले. दोन्ही ठिकाणचे अहवालही मागवले आणि काँग्रेस पक्षाने अंबरनाथ शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करत, 12 नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले.

भाजपनेही आघाडी मोडली

या पाठोपाठ भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या दोन्ही ठिकाणी काँग्रेससह अन्य विरोधकांना घेऊन केलेली आघाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोडून टाकली. काँग्रेस आणि एआयएमआयएमसोबतची युती मान्य नाही. ती तोडावी लागेल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसे आदेशही जारी करण्यात आले. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाराजीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नगरपरिषद निवडणुकीत एमआयएमसोबत युती करून पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरूंग लावला आहे. कुणालाही विश्वासात न घेता पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे आपल्यावर कारवाई का करू नये, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी नोटीशीत नमूद केले आहे.

BJP
Wada College Hostel Incident: विद्यार्थिनींकडून जबरदस्तीने नमाज पठण; अज्ञात युवतीविरोधात गुन्हा

अंबरनाथचे काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपात जाणार

भाजपशी आघाडी केली म्हणून काँग्रेसने निलंबित केलेल्या 12 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन ते तीन दिवसात त्यांना भाजपात प्रवेश दिला जाईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत दिली. हे सर्व नगरसेवक अंबरनाथच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपात प्रवेश करत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी काँग्रेसकडून निलंबित झालेले अंबरनाथचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटीलही उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news