

मृणालिनी नानिवडेकर
मुंबई : 7 पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील निवडणुकीतल्या एकत्रिकरणानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका तथा ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स म्हणजेच एनडीएमध्ये सहभागी व्हावे, यासाठी पुढाकार घेतला आहे.
नवी दिल्लीतील भाजप नेत्यांना आपण शरद पवार यांच्या समावेशासाठी यशस्वी प्रयत्न करू, असे अजित पवारांनी सांगितले असल्याचे सूत्रांकडून कळते. गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे नेते सातत्याने परस्परांच्या भेटी घेत आहेत. शरद पवारांच्या नेतृत्वातील काही खासदारांनीही आता एनडीएमध्ये सहभागी होणे योग्य ठरेल, अशी भूमिका संसद अधिवेशनादरम्यान घेतली होती. सत्तारूढ आघाडीत समाविष्ट झाल्यास विकासकामांना निधी मिळतो असे या खासदारांचे म्हणणे आहे.
केवळ दोन खासदार वगळता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अन्य खासदारांचा कल सत्ताधारी बाकांवर जाण्याकडे आहे. त्यावर आताच कोणतीही फूट न घडवता पक्षानेच एकत्रितपणे भूमिका बदलावी यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू झाल्या होत्या. आता त्या हालचाली मी पूर्णत्वाला नेतो, असे अजित पवार यांनी केंद्रातील भाजप नेत्यांना सांगितले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकात एकत्र लढण्याचा निर्णय प्रत्यक्षात आणण्यास शरद पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मान्यता दिल्यानंतर अजित पवार यांनाही या सगळ्या घडामोडी म्हणजे पुन्हा एकत्र येण्यासंदर्भातील सकारात्मक पाऊल वाटत असल्याचे त्यांच्या निकटच्या नेत्याने दै. ‘पुढारी’ला सांगितले.
यासंदर्भात पवार कुटुंबात काही हालचाली सुरू झाल्या आहेत असे बारामतीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातून लक्षात आल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील एका प्रमुख नेत्याने व्यक्त केले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सध्याचा राजकीय संघर्ष म्हणजे आपापली मते वाढवण्याचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे राज्यातले सत्ताधारी नंतर एकत्र असणार हे उघड सत्य असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. खासदार सुळे यांचा भाजपविरोध मावळला आहे काय, याबद्दल केंद्रातील भाजप नेत्यांच्या मनात शंका आहे.
खुद्द शरद पवार हेही पवार बाजू बदलतील काय, याबद्दल आधीचा अनुभव वेगळा आहे असे स्मरण दिल्लीस्थित एका ज्येष्ठ नेत्याने अजित पवारांना करून दिल्याचे समजते. मात्र, या वेळचे चित्र सर्वस्वी वेगळे असेल, असे अजित पवारांनी भाजपला सांगितले आहे.
अजित पवारांना नैराश्याने ग्रासले असल्याचा आरोप आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी केला. खुद्द अजित पवारांच्या तालमीत तयार झालेल्या आमदाराने असे बोलणे हे धक्कादायक मानले जात आहे. दरम्यान, महायुतीत आपलीही ताकद महत्त्वाची असल्याचे दाखवण्यासाठी पवार कुटुंबाचे मनोमीलन घडवून आणण्याच्या मोहिमेवर अजित पवार आहेत, असे एका माहितीगाराने सांगितले.
पवार कुटुंबाचे पुन्हा एकदा एकत्र येणे हे राजकीय मनोमीलन आहे, असे सांगत नेते ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केंद्रात सुप्रिया सुळे, तर राज्यात रोहित पवार लवकरच मंत्री होतील, असे भाकीत या पार्श्वभूमीवर केले आहे.