

Devendra Fadnavis on local alliance
मुंबई : "भाजप कधीही काँग्रेस किंवा एमआयएमसोबत युती करू शकत नाही, अशा युती पक्षाला मुळीच मान्य नाही," अशा शब्दांत अंबरनाथ आणि अकोट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने काँग्रेस आणि एमआयएम (AIMIM) सोबत केलेल्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
बुधवारी सकाळी अंबरनाथ नगर परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आपला मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला बाजूला केले. त्याऐवजी 'अंबरनाथ विकास आघाडी'च्या नावाखाली काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली. दुसरीकडे, अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेतही भाजपने एमआयएमसोबत युती केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती.
या प्रकरणी एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " या दोन्ही युतींना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची मंजुरी नव्हती. स्थानिक नेत्यांनी एकतर्फी घेतलेला कोणताही निर्णय शिस्तीच्या दृष्टीने चुकीचा आहे. भाजप कधीही काँग्रेस किंवा एआयएमआयएमसोबत युती करू शकत नाही. अशा युती अस्वीकार्य आहेत आणि त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, "अशा प्रकारची युती रद्द करण्याचे निर्देश आधीच देण्यात आले आहेत. जर कोणत्याही स्थानिक भाजप नेत्यांनी परवानगीशिवाय या पक्षांसोबत (एआयएमआयएम, काँग्रेस) युती केली असेल, तर तो पक्षशिस्तीचा गंभीर भंग आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल."
"अकोटमध्ये एमआयएम-भाजप युती झाली असल्यास कारवाई करू, असा इशारा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी दिला आहे. भाजपला कोणताही राजकीय पक्ष युतीसाठी चालतो, असा आरोपही त्यांनी केला. आम्ही स्वतंत्र निवडणूक लढलो आहोत. आता सभागृहात आम्ही आमचे १२ सदस्य घेऊन पुढे जाणार आहोत. तिथे भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे, त्यामुळे भाजपला आमचा कुठल्याही प्रकारचा पाठिंबा आहे, असे चित्र नाही. स्थानिक पातळीवर निवडणुकीनंतर जर स्थानिक आघाड्या होत असतील, तर त्या करण्याच्या अनुषंगाने त्यांनी आमची परवानगी घेतली पाहिजे, अशी सूचना सर्वांना दिली आहे, असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले."