

भाईंदर : राजू काळे
उत्तनमधील समुद्रात 2 जानेवारी रोजी मासेमारीसाठी गेलेल्या बोटीतून खलाशी समुद्रात पडल्याची घटना घडली. त्याचा शोध घेऊ नदेखील तो सापडला नाही. मात्र पाच दिवसानंतर हा खलाशी थेट बोट मालकाच्याच घरी मध्यरात्रीच्या सुमारास हजर झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
उत्तनमधील मच्छीमार लार्सन रेमंड बाड्या यांची सिएरा नावाची बोट मासेमारीकरीता 2 जानेवारी समुद्रात गेली होती. रात्रीच्या वेळी बोटीवरील सर्व खलाशी झोपी गेले असता त्यातील सियाराम नागवंशी नामक खलाशी समुद्रात पडल्याची घटना घडली. त्याचा शोध घेतल्यानंतर तो कुठेही सापडला नाही. मात्र 5 दिवसानंतर म्हणजेच 6 जानेवारी रोजी मध्यरात्री 1.30 वाजता तो थेट बोट मालकाच्या घरी प्रगटल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला तसेच तो जिवंत घरी पोहोचल्याचा आनंदही व्यक्त केले जात आहे.
लार्सन यांची सिएरा नामक मासेमारी बोट तांडेल व खलाशांसह 2 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास मासेमारीकरीता गेली होती. रात्रीची वेळ असल्याने बोट तांडेल चालवित होता तर सर्व खलाशी बोटीवरच झोपले होते. झोपलेल्या खलाशांमधील सियाराम नागवंशी हा खलाशी समुद्रात पडला. त्याची माहिती कोणालाच नसल्याने तांडेलने बोट सुमारे तीन नौटिकल मैल पुढे नेली. यानंतर सियाराम बोटीवर नसल्याची बाब तांडेलच्या लक्षात आली. तो कुठे गेला अथवा समुद्रात पडला, याची नक्की माहिती मिळत नसल्याने तांडेल यांनी तत्काळ बोटीचे मालक लार्सन यांना संपर्क साधून त्यांना घडलेली घटना सांगितली, घटनेचे गांभीर्य ओळखून लार्सन यांनी सियारामला शोधण्याच्या सूचना बोटीवरील तांडेल व खलाशी यांना दिल्या. तसेच बोटीवरून सियाराम बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यास लार्सन हे उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गेले.
मात्र पोलिसांनी, सियारामचा शोध प्रथम तुम्ही घ्या. त्यानंतर 24 तासांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करू, असा सल्ला लार्सन यांना दिला. यानंतर सिएरा बोटीवरील तांडेल, खलाशांसह इतर मासेमारी बोटींवरील मच्छीमारांनी सलग दोन ते तीन दिवस सियारामचा समुद्रात शोध घेतला मात्र त्याचा पत्ता लागला नाही.
तब्बल 5 दिवसांनी मंगळवारी मध्यरात्री 1:30 वाजता अचानक लार्सन यांच्या घराचा दरवाजा वाजला. लार्सन यांनी दार उघडताच त्यांच्या समोर सियाराम उभा होता. त्याला पाहून लार्सन यांना सुरुवातीला आश्चर्याचा धक्का बसला.
स्वतःला सावरून बोटमालकाने सियारामला घडलेल्या घटनेबाबत विचारले. त्यावर सियारामने सांगितले की, मी समुद्रात पडल्यानंतर बराच वेळ पोहत होतो. दरम्यान मला एक लाईट दिसली. लाईटच्या प्रकाशाच्या दिशेने मी पोहत गेलो असता ती एक मासेमारी बोट असल्याचे दिसून आले. मग त्या बोटीचा आसरा घेत किनाऱ्यावर पोहोचल्याचे सियारामने लार्सन यांना सांगितले. सियाराम सुखरूप तसेच जिवंत घरी आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला तर तब्बल 5 दिवस समुद्रात राहिलेला सियाराम थेट मालकाच्या घरी पोहोचल्याचे आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे.