

मुंबई : सत्तर हजार कोटींच्या फाईलवरून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात निर्माण झालेल्या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मध्यस्थी केली आहे. यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात निर्माण झालेली राजकीय कटुता कमी झाली आहे.
आपल्यावर 70 हजार कोटी रुपयांचा आरोप असतानाही आपण भाजपसोबत सत्तेत आहोत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील एका पत्रकार परिषदेत केले होते. याप्रकरणी सर्वात प्रथम भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पवार यांच्यावर कडवट शब्दात टीका केली होती. त्यांच्यापाठोपाठ भाजप निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी 70 हजार कोटी रुपयांच्या आरोपांची पाने पुन्हा उघडण्यास भाग पाडू नका, असा इशारा दिला होता.
निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजप नेते टीका करू लागल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मागील दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बावनकुळे यांची भेट घेतली. दोन्ही बाजूकडून झालेल्या वक्तव्यांवरून कटुता वाढू नये, अशी भावना आपण या भेटीत व्यक्त केल्याचे तटकरे यांनी सांगितले. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा तटकरे यांच्या हस्ते प्रकाशित झाला, त्यावेळी ते बोलत होते.
राज्याचे हित जपण्यासाठी आम्ही महायुतीमध्ये आलो आहोत. त्यामुळे वाद निर्माण होऊन महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचा लाभ होणार नाही, याची आम्ही दक्षता घेत आहोत. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली होती. मात्र, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून वाद मिटविला. महानगरपालिकांच्या निवडणुकीतही आम्ही अशाच प्रकारची रणनीती आखली आहे. त्यानुसार आम्ही तिन्ही पक्ष स्वबळावर लढत आहोत. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई इत्यादी ठिकाणी भाजप, शिंदे सेना व राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहेत. निवडणुका संपल्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र येणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील मुस्लिम बांगला देशी असल्यामुळे त्यांना भारतातून हुसकावून लावा, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख नवाब मलिक म्हणाले, मुंबईतील बांगला देशी नागरिकांना मुंबईतून बाहेर काढण्याची प्रक्रिया मागील 50 वर्षांपासून सुरू आहे. पण, निवडणुका आल्यानंतर काही लोक मुस्लिमांना राजकीय लक्ष्य करतात. साटम यांच्या मतदारसंघात 60 हजार मुस्लिम मतदार आहेत. या सर्वांच्या घरी साटम जातात, जेवतात व मतेही मागतात; पण त्यांचे लक्ष विरोधी पक्षांच्या मतदारसंघातील मुस्लिमांकडे असते. जर मुस्लिम हाकलायचे असतील, तर भारतात आश्रयाला असलेल्या बांगला देशच्या शेख हसीना यांच्यापासून सुरुवात करावी, असे आव्हान मलिक यांनी दिले.