

मुंबई : पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी-विक्रीचे ते प्रकरण शंभर टक्के घोटाळा असून, त्याचा तपास सुरू आहे, तो संपलेला नाही. एफआयआरमध्ये नाव नाही याचा अर्थ सुटलात असा होत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवारांना इशारा दिला. तसेच, ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीचा आता कोणताही परिणाम होणार नाही. उलट या युतीचा सर्वात मोठा फटका हा राज ठाकरे यांना बसणार आहे. निवडणुकांचे निकाल आल्यावर हे सगळ्यांना दिसेल, असेही ते म्हणाले.
पुण्यातील सरकारी जमिनीची खरेदी-विक्री हा शंभर टक्के घोटाळाच असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका हिंदी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बुधवारी स्पष्ट केले. ते म्हणाले, सरकारची जमीन अशा पद्धतीने कोणी विकायला काढतो आणि खरेदी करतो, हा शंभर टक्के घोटाळा आहे. त्यामुळे कोणीही मागणी करण्यापूर्वी सरकारने याप्रकरणी एफआयआर दाखल केला. आयोगाच्या माध्यमातून चौकशी सुरू केली आहे. अशा प्रकरणात ज्यांचा थेट संबंध येतो त्यांचे नाव एफआयआरमध्ये येते. या एफआयआरमध्ये पार्थ पवारांचे भाऊच आहेत. शिवाय, खरेदी करणारे-विकणारे आणि सरकारी अधिकारी यांच्यावर एफआयआर दाखल आहे. तुमचे नाव एफआयआरमध्ये नाही याचा अर्थ तुम्ही सुटलात, असे होत नाही. तपासानंतर चार्जशीट दाखल केली जाते, ते महत्त्वाचे असते. या तपासात जे कोणी सापडतील त्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल मुख्यमंत्री म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी माणसासह मतदारांचा विश्वास गमावला आहे. ते 2009 साली एकत्र आले असते, तर कदाचित तेव्हा वेगळे निकाल आले असते. दुर्दैवाने दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीतच राज यांना नाकारले होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव ब्रँड होते. मराठीच्या सन्मानाने लढणे आणि त्यासाठी आग्रही असणे योग्य आहे. मात्र, त्याचे निमित्त करून गरिबांवर आणि दुर्बल घटकांवर गुंडगिरी करणे चुकीचे आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनीही आपल्या काळात मराठीचा आग्रह धरला; पण सर्व हिंदूंना संरक्षित करण्याचे कामही केले. आता तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा मुखवटा उतरला आहे. काँग्रेसपेक्षा जास्त तुष्टीकरण उद्धव ठाकरेंचा पक्ष करत आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला.