

वाडा : वाडा तालुक्यातील पोशेरी गावात असणाऱ्या आयडियल कॉलेजच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीला जबरदस्तीने नमाज पठन करण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वाडा पोलीस ठाण्यात अज्ञात विद्यार्थिनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाडा पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधिक्षक यतीश देशमुख, स्थानिक पोलीस व पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान या प्रकाराने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नाशिक जिल्ह्यातील एक विद्यार्थिनी 1 जानेवारीपासून आयडियल फाऊंडेशन कॉलेजमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील फिजिओथेरपी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. कॉलेजच्या वसतिगृहात इतर तीन विद्यार्थिनींसोबत ती राहत असून 4 जानेवारीला रात्री सुमारे 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास वसतिगृहात वॉटर फिल्टर मधील पाणी आणण्यासाठी सहाव्या मजल्यावर गेली होती. पाणी घेऊन येत असताना पायरी जवळच चेहऱ्याला सफेद कपडा बांधलेली एक अज्ञात युवतीने विद्यार्थिनीला अडवून हमारे जैसा नमाज करो असे सांगितले. पीडित विद्यार्थिनीने मला नमाज येत नसल्याचे सांगितले मात्र अज्ञात युवतीने तुला नमाज पठण करावा लागेल असे सांगत जोर जबरदस्तीने,
दबाव टाकत नमाज पठण करण्यास भाग पाडले. कॉलेजमध्ये नवीन असल्याने व घटनास्थळी एकटीच असल्याने नाईलाजाने या विद्यार्थिनीने नमाज पठण केला. घडलेल्या प्रकाराने पीडित विद्यार्थिनी प्रचंड मानसिक दबावाखाली आली असून नातेवाईकांना कळवून या घटने विरोधात वाडा पोलीसात फिर्याद नोंदविण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या या प्रकाराने खळबळ माजली असून याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
सामाजिक व धार्मिक सलोखा बिघडू नये यासाठी पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक चौकशीत हा प्रकार रॅगिंगशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधितांविरोधात गुन्हा दाखल आला असून अधिक तपास सुरू आहे.