Municipal Corporation Election | दोन्ही राष्ट्रवादीसमोर अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान

दोन गटांत विभागली ताकद; अनेक ठिकाणी भाजपशी थेट सामना
NCP factions survival challenge
Municipal Corporation Election | दोन्ही राष्ट्रवादीसमोर अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हानPudhari File Photo
Published on
Updated on

चंदन शिरवाळे

मुंबई : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक न राहता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. महायुतीमधील भाजपने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षालाही अनेक ठिकाणी कोणी सोबत घेतलेले नाही. यामुळे आपली ताकद दाखविण्यासाठी या दोन्ही पक्षांना झुंज द्यावी लागत असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच शहरी पातळीवरील मोठी निवडणूक आहे. अखंड राष्ट्रवादीचा प्रभाव ग्रामीण भागात अधिक राहिला असला तरी पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर यांसारख्या शहरांमध्ये राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद होती. ती ताकद आता दोन गटात विभागली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षालाही भाजपसोबत घेईल, अशी अनेकांना खात्री होती. पण शिंदे गटाला सोबत घेऊन अजित पवार गट वार्‍यावर सोडला आहे. पुणे आणि पिंपरी - चिंचवडमध्येही भाजपने हात झटकाल्यामुळे नाईलाज म्हणून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन तिथे भाजपशी सामना करत आहेत.

प्रत्येक निवडणूक कूस बदलत असते. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मिळालेले यश महापालिका निवडणुकीत मिळेलच असे नाही. तोच प्रकार अजित पवार गटालाही लागू पडतो. विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत होती. तेंव्हा या पक्षाचे 41 आमदार निवडून आले होते. आता भाजपसोबत नाही. सर्वच पालिका निवडणुकीत भाजपने आव्हान उभे केले आहे. त्यामुळे अजित पवार गटाला महापालिका निवडणुकीत संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे.

भाजपने सोबत घेतले असते तर, अजित पवार यांना महापालिकांच्या निवडणुका हलक्या गेल्या असत्या. पुणे-पिंपरीत तळ ठोकून त्यांना बसावे लागले नसते. आता किमान ही दोन शहरे आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. या दोन शहरांच्या पलीकडे अजित पवार यांचा इतर शहरी मतदारांवर प्रभाव नाही. प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला तरी त्यांनी इतर महापालिकांच्या निवडणूक प्रचारासाठी वेळ दिलेला नाही. त्यामुळे इतर शहरातील राष्ट्रवादीचे उमेदवार नाराज आहेत. सध्या ते उपमुख्यमंत्री असल्यामुळे प्रचार सभांमधून विकासाची भाषा आणि निधी उपलब्धता यावर भर देत आहेत. मात्र, सत्तेसाठी पक्ष फोडला हा आरोप त्यांना आताही झेलावा लागत आहे.

निधीची कमतरता अन् सत्तेबाहेर असण्याचे तोटे

शरद पवार गटाचीही या निवडणुकांच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी पक्ष फुटीनंतरची सहानुभूती त्यांना मिळाली होती. आता त्यांच्याकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी राहिली नाही. निधीची कमतरता आणि सत्तेबाहेर असण्याचे तोटे त्यांच्यासमोर असले तरी वैचारिक वारसा आणि सहानुभूतीच्या आधार घेऊन शरद पवार गट लढत आहे. मनसे आघाडीत नको, या काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना उबाठा दूर झाल्याचा फटका शरद पवार गटाला बसणार आहे. भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात लढत असले तरी त्यांच्या ताकदीने दोन्ही राष्ट्रवादी गटांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news