'मनसे' से'ची ची झाकली मूठ सव्वादोनशे जागांची ! | पुढारी

'मनसे' से'ची ची झाकली मूठ सव्वादोनशे जागांची !

गौरीशंकर घाळे, मुंबई :  यंदा विधानसभेच्या दोनशे ते सव्वादोनशे जागांवर मनसे तयारी करत आहे, असे खुद्द पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभेत नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभेत काय करणार, या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी अनुत्तरित आहे.

महायुतीच्या जागा वाटपात मनसेने वीस जागा मागितल्या

किंवा मनसेला वीस जागा दिल्या जाणार, या चर्चा काही दिवस सुरू होत्या. या सर्व चर्चाना ‘कुणीतरी सोडलेली पुडी’ म्हणत राज ठाकरेंनी फटकारले. या पुड्यांचाही आता एक ‘पॅटर्न’ बनला आहे. वर्धापन दिन, पक्षाचा पाडवा मेळावा किंवा तत्सम एखादा मेळावा जवळ आला की मनसेच्या संदर्भात काही चर्चा सुरू होतात. मग, पक्षाध्यक्ष त्या चर्चाना कधी पुडी तर कधी आणखी काही म्हणत झिडकारतात. वीस जागांची चर्चा आता सोडलेली पुडी ठरल्याने पुढच्या मेळाव्यापर्यंत सव्वादोनशे जागांची चर्चा मात्र चालत राहील.
‘विधानसभेच्या जागा मागण्यासाठी मी कुणाच्या दारात जाणार नाही. वीसच जागा का आणि त्या कोण देणार’, असा प्रश्न राज यांनी अलीकडेच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केला. वीस कशाला दोनशे ते सव्वादोनशे जागांवर तयारी करत असल्याचेही ते म्हणाल्याची चर्चा आहे, पण सव्वादोनशे जागांवर मनसेची तयारी सुरू असली तरी किती जागा लढविणार, हे अजून ठरायचे आहे. यापैकी दोनशे जागा लढवत उर्वरित ८८ जागा महायुतीच्या भाजप, शिंदेंची शिवसेना वगैरे पक्षांना देणार का? की स्वबळावर इतक्या जागांवर उमेदवार उभे करत महाराष्ट्राच्या षटकोनी राजकारणाला सातवा कोन जोडणार? या प्रश्नांची उकल व्हायला वेळ आहे.

नवी समीकरणे जुळण्याची शक्यता ?

लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय मतदानाची आकडेवारी महायुतीची चिंता वाढविणारी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात नवी समीकरणे जुळण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभेतील गणित जुळविण्यासाठी एकनाथ शिंदेंना अधिकचे काहीतरी लागणार आहे. ही गरज मनसेच्या इंजिनाने भरून निघू शकते; मात्र त्यासाठी मनसेचे धोरण आणि इंजिनाची दिशा महत्त्वाची ठरणार आहे.

Back to top button