एलियन्स तर कधीच पृथ्वीवर मुक्कामी आलेत! | पुढारी

एलियन्स तर कधीच पृथ्वीवर मुक्कामी आलेत!

मुंबई, पुढारी डेस्क : मानवी विज्ञान सतत परग्रहावरील जीवसृष्टीचा आणि खास करून एलियन्स म्हणजे परग्रहवासीयांचा शोध घेत असले तरी हार्वर्ड विद्यापीठाच्या एका ताज्या संशोधनाने या शोधयात्रेला मोठा आश्चर्याचा धक्का दिला आहे. हे परग्रहवासी कधीपासूनच पृथ्वीवर दाखल झालेले असून, वेगवेगळे अवतार धारण करून ते आपल्यात राहात आहेत… आणि उडत्या तबकड्या म्हणजे दंतकथा नव्हेत. पृथ्वीवर राहणार्‍या आपल्या एलियन्स मित्रांना भेटण्यासाठी त्यांचे परग्रहवासी मित्र या त्यांच्या अवकाश यानातून येत-जात असावेत.

हार्वर्ड विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनात हे धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत. ‘कुणीतरी आहे तिथे’ हा संशय मानवी जीवनात कायम घर करून बसला आहे. पृथ्वीपलीकडे अवकाशात कुठल्या तरी ग्रहावर जीवसृष्टी असेल, ही आशा आजवर नुसतीच जिवंत नाही; या जीवसृष्टीला सतत सांकेतिक निरोपही मानवी शास्त्रज्ञ पाठवत आले आहेत. आजही हे संदेश पाठवणे थांबलेले नाही. एकीकडे परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेण्याचा विज्ञानाचा प्रयत्न, तर दुसरीकडे चित्रपटसृष्टीच्या कल्पनाविश्वाने तर या एलियन्सवर आतापर्यंत चित्रपटही काढले. वैज्ञानिक संशोधनाने पुरवलेले धागे घेऊन अनेक पटकथा त्यात गुंफल्या. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल, स्पेसिस, प्रेडेटरसारखे अत्यंत दर्जेदार रंजक आणि रहस्यमय हॉलीवूडपटही तयार केले गेले. ‘कोई मिल गया’ आणि ‘पीके’सारखे बॉलीवूडपटही एलियन्समुळेच गाजले.

अर्थात एलियन्स ही एक वैज्ञानिक कल्पना असून ती प्रत्यक्षात उतरवण्याचे हे रंजक प्रयत्न आहेत, असे आपण समजून चाललो. मात्र, हेच एलियन्स तुमच्या-आमच्यामध्ये कधीपासूनच वावरत आहेत, राहात आहेत. वेगवेगळ्या अवतारांत, रूपांत ते आपल्याशी व्यवहारही करताहेत, हे सांगून हार्वर्ड विद्यापीठाने एखाद्या रहस्यपटाचा क्लायमॅक्सदेखील देणार नाहीत, असा जबर धक्का दिला.

पृथ्वीवर राहणार्‍या आपल्या एलियन्स मित्रांना भेटण्यासाठी या तबकड्यांमध्ये बसून परग्रहावरील एलियन्स पृथ्वीवर येत असावेत, असा अंदाज नोेंदवून हार्वर्डचे संशोधक आपल्या संशोधनपर लेखात स्पष्टपणे सांगतात की, पृथ्वीवर आपल्या अवतीभवती या परग्रहवासी जीवांची एखादी संस्कृती नांदत असावी.

हार्वर्डच्या संशोधकांची चार गृहीतके

अलौकिक मानव : या गृहीतकानुसार हे जीव अत्यंत पुढारलेले तंत्रज्ञान वापरत असावेत. एखाद्या मोठ्या प्रलयातून वाचून ते जिवंत राहिले असावेत आणि त्यांची पुढची पिढी अधिक प्रगत होत गेली असावी.

वानराच्या जातीचे अलौकिक जीव : हे जीव अत्यंत बुद्धिमान असून, ते शेपटी नसलेले वानर अथवा डायनोसोरच्या रूपात असावेत आणि ते पृथ्वीवरच मानवाच्या सोबत अत्यंत गुप्तपणे वावरत असावेत.

प्रगत अलौकिक जीव : हे जीव पृथ्वीबाहेरच्या एखाद्या ग्रहावरचे असावेत. ते कदाचित मानवाची पुढची पिढी म्हणून आपल्यासोबत वास करत असावेत. अशा प्रकारचे जीव चंद्रावर किंवा चंद्राच्या पृष्ठभागाखाली असण्याची शक्यता आहे.

जादूई जीव : पुराणामध्ये आढळणार्‍या परी, अप्सरा अथवा तत्सम काल्पनिक वर्णनांशी मिळतेजुळते असे जीव आहेत.
अर्थात, हे संशोधन सध्या अत्यंत प्राथमिक अवस्थेत असून त्यावर काम सुरू आहे. मानवी कल्पनेत असणार्‍या गोष्टी खरोखरच अस्तित्वात आहेत का, याचा शोध घेणे हा या संशोधनाचा हेतू असल्याचे हार्वर्डने स्पष्ट केले आहे.

Back to top button