सांगलीत नाराजी दाखवाल, तर कोल्हापुरात शिवसेना नाराजी दाखवू शकेल : संजय राऊत | पुढारी

सांगलीत नाराजी दाखवाल, तर कोल्हापुरात शिवसेना नाराजी दाखवू शकेल : संजय राऊत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेबाबत निर्णय झाला आहे. ती जागा शिवसेनाच (ठाकरे) लढणार आहे. त्यामुळे तेथे काँग्रेस नेते विशाल पाटील वेगळा निर्णय घेणार नाहीत. 2019 मध्ये केलेली चूक ते पुन्हा करणार नाहीत, असा विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. उमेदवार आणि जागावाटप पूर्ण झालेले आहे. त्यामुळे जागावाटपात कोणताही बदल होणार नाही. सांगलीत कोणीही नाराजी दाखवली, तर शिवसेनेचे लोक कोल्हापुरातही नाराजी दाखवू शकतील, असा इशाराही राऊत यांनी काँग्रेसला दिला.

जागावाटपानंतर सांगलीचे नेते ‘नॉट रिचेबल’ असून, जागेसंदर्भात बदल अपेक्षित आहे का, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता राऊत म्हणाले, जागावाटप आणि उमेदवार जाहीर झालेले आहेत. त्यात आता कोणताही बदल होणार नाही; पण आम्ही काँग्रेस नेत्यांची समजूत काढू. नाराजी म्हणाल तर आमचे लोकही दाखवू शकतात. अमरावती, कोल्हापूर, रामटेक येथे आमच्याही कार्यकर्त्यांनी नाराजी दाखवली; पण आम्ही त्यांची समजूत काढली. आता सर्वांनी आघाडीचा धर्म पाळला पाहिजे. त्यामुळे जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्या, तरी सर्वांना काम करावे लागणार आहे, असेही राऊत म्हणाले.

जागावाटपात सांगलीत काँग्रेस नेते कमालीचे नाराज आहेत. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे. जनतेची सहानुभूती त्यांच्यासोबत आहे. आमदार, खासदार पक्षाला सोडून गेले असले, तरी कार्यकर्ते आमच्यासोबतच आहेत. परंतु, गेल्यावेळी आमचे 18 खासदार निवडून आले होते, तर राज्यात काँग्रेसचा केवळ एकच खासदार जिंकून आला होता. त्यामुळे ज्या-ज्या भागात आमची ताकद होती, तेथील जागा आम्ही घेतल्या. जबरदस्तीने घेतलेल्या नाहीत, असे राऊत म्हणाले. भाजपबरोबर युतीत असतानाही शेवटपर्यंत एखाद-दुसर्‍या जागेवरून मतभेद होत होते. त्यामुळे अशाप्रकारे अडचणी येणार, हे गृहीत धरले होते. त्यात सांगली आणि भिवंडीचा तिढा निर्माण झाला. सांगलीत परंपरेने काँग्रेसचे लोक निवडून आलेले आहेत. शिवसेनेची निवडणूक लढण्याची ताकद कमी असली, तरी मतदार ‘मशाली’ला मतदान करतील, असा आमचा विश्वास आहे. तेथे 2014 मध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता. 2019 मध्ये काँग्रेस तेथे लढलीच नव्हती, तर त्यांनी ती दुसर्‍या पक्षाला जागा सोडली होती, असेही राऊत म्हणाले.

विश्वजित कदमांवर सोपवली जबाबदारी

विशाल पाटील हे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे का, असे राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, ते केवळ एक चित्र आहे. विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. विशाल पाटील यांनी 2019 मध्ये काँग्रेस सोडली होती आणि ते दुसर्‍या पक्षाकडून उभे राहिले होते. त्यांना त्यात यश मिळालेले नाही. त्यामुळे ते 2019 ची चूक पुन्हा करणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विश्वजित कदम हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत आणि विशाल पाटील यांना समजावण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण शांत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विशाल पाटील यांना ‘वंचित’चा पाठिंबा!

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचे संकेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी अकोला येथे पत्रकारांशी बोलताना दिले. महाविकास आघाडीमधून सांगलीत काँग्रेसतर्फे लढण्यासाठी विशाल पाटील इच्छुक होते. त्यांना उमेदवारी मिळाली नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली. त्यामुळे विशाल यांचे बंधू व माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी बुधवारी अकोल्याकडे तातडीने धाव घेतली. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसला सांगलीची जागा लढवायची आहे. याबाबत प्रतीक पाटील यांच्याशी चर्चा झाली. आता त्यांनी निर्णय घ्यावयाचा आहे, असे सांगत आंबेडकर यांनी त्यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत विशाल यांनी स्वाभिमानी संघटनेच्या बॅट चिन्हावर, तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीमधून कपबशी चिन्हावर निवडणूक लढवली होती. विशाल यांना सुमारे साडेतीन लाख, तर पडळकर यांना तीन लाखांवर मते मिळाली होती. पडळकर यांच्या उमेदवारीचा फटका विशाल यांना बसल्याने खासदार संजय पाटील विजयी झाले होते.
वंचित बहुजन आघाडीने माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्रतीक पाटील पदाधिकार्‍यांसह मंगळवारी रात्रीच अकोल्यास अ‍ॅड. आंबेडकर यांना भेटण्यासाठी गेले. बुधवारी सकाळी त्यांनी भेट घेतली. गेल्यावेळी वंचितच्या उमेदवारामुळे आम्हाला फटका बसला. यावेळी आम्हाला तुम्ही मदत करा, अशी मागणी प्रतीक यांनी केली.

Back to top button