Lok Sabha Elections 2024 : राज्यात राजकीय धुळवड! | पुढारी

Lok Sabha Elections 2024 : राज्यात राजकीय धुळवड!

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात होणार्‍या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली, तरी महायुतीत जागावाटपावर अंतिम तोडगा निघालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी तिसर्‍यांदा दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली; तरीही काही मतदारसंघांचा पेच कायम आहे. भाजपने रविवारी राज्यातील आणखी तीन उमेदवार जाहीर केले. त्यात भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे, गडचिरोली-चिमूरमधून अशोक नेते, तर सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही येत्या दोन दिवसांत आपापली यादी जाहीर करणार आहेत. सातारा, माढा, ठाणे, नाशिक, धाराशिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवरील पेच कायम आहे.

अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शनिवारी दिल्लीत पाचारण करत जागावाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. रविवारीही दिल्लीत जागावाटपावर खलबते करण्यात आली. मात्र, अंतिम निर्णय झाला नाही. एकत्रित जागावाटप जाहीर करण्यापेक्षा ज्या जागांवर मतभेद नाहीत अशा जागांवरील उमेदवार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही जाहीर करावेत. ज्या जागांवर आणि उमेदवारांविषयी एकमत नाही, त्यावर राज्यात शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून मार्ग काढावा, अशा सूचना शहा यांनी दिल्या. कोणत्याही मतदारसंघात बंडखोरी होणार नाही. महायुतीत मतभेद उफाळून येणार नाहीत, याविषयी तिन्ही नेत्यांनी सतर्क राहावे, असेही शहा यांनी सांगितले.

तीन नावांची घोषणा

रविवारी भाजपने देशभरातील 111 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. भंडारा-गोंदियातून सुनील मेढे, गडचिरोली-चिमूरमधून अशोक नेते, तर सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या तिघांच्या घोषणेनंतर भाजपने राज्यातील जाहीर केलेल्या उमेदवारांची संख्या आता 23 झाली आहे.

सोलापुरात उमेदवार बदलला

सोलापूरमधून भाजपचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता होती. पक्षाने विद्यमान खासदार जयसिद्धेेश्वर स्वामी यांचे तिकीट कापून आमदार राम सातपुते यांना तिकीट दिले आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात आता काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात थेट लढत होणार आहे.

उदयनराजेंना घड्याळ नको

सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचे ठरले असले, तरी माजी खासदार उदयनराजे भोसले हे हाती घड्याळ बांधायला तयार नसल्याने भाजप आणि अजित पवारांचीही अडचण झाली आहे. दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवण्यात आला; पण त्यांनी तो अमान्य केला. मी कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी अमित शहा आणि फडणवीस यांच्याकडे स्पष्ट केले. त्यामुळे ही जागा भाजपकडे घेऊन माढा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यावर सहमती झाल्याचे समजते. धाराशिव मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्याकडे सक्षम उमेदवार नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनेही दावा केला आहे. या ठिकाणी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी आणि आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नीचे नाव चर्चेत आहे.

नाशिकमध्ये गोडसेंचा पत्ता कट होण्याची शक्यता

नाशिकमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट निश्चित मानले जात होते. मात्र, भाजपनेही या जागेसाठी आता आग्रह धरला आहे. भाजपच्या या रणनीतीची कुणकुण लागल्याने खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आपल्या समर्थकांना घेऊन शक्तिप्रदर्शन केले.

राणे लढल्यास कोकणला फायदा : केसरकर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातही माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे की किरण सामंत निवडणूक लढणार, याचा पेच सुटलेला नाही. शिवसेनेकडून किरण सामंत हे शिवसेना (उबाठा) गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना टक्कर देणार असल्याचे सांगितले जात असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे निवडणूक लढले, तर त्याचा कोकणला फायदा होईल, असे म्हटले आहे. या जागेवरही भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात एकमत झालेले नाही.

ठाण्यात नाईकांच्या हाती धनुष्यबाण?

ठाणे मतदारसंघ शिवसेनेला देण्याचे भाजपने मान्य केले असले, तरी शिंदेंकडे तुल्यबळ उमेदवार नाही, असे भाजपचे म्हणणे आहे. शिंदेंकडून आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश मस्के आणि माजी विधान परिषद सदस्य रवींद्र फाटक यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, या नावांवर भाजप समाधानी नाही. त्यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी आमदार गणेश नाईक किंवा माजी खासदार संजीव नाईक यांना आपले धनुष्यबाण चिन्ह देऊन निवडणूक रिंगणात उतरावे, असा प्रस्ताव भाजपने दिल्याचे समजते. मात्र, मुख्यमंत्र्यांना हा प्रस्ताव मान्य नसल्याने पेच कायम आहे.

अजित पवार गटाची यादी गुरुवारी

महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नसला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 5 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. पक्षाने 9 जागा मागितल्या होत्या. अजूनही जागावाटपाबाबत चर्चा सुरूच आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पहिली यादी गुरुवारी, 28 मार्च रोजी जाहीर केली जाईल, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. काही जागांबाबत पेच कायम असून, तो लवकरात लवकर सोडवून यादी जाहीर केली जाणार आहे.

शिंदे गटाची यादी आज जाहीर होण्याची शक्यता

शिवसेना शिंदे गटाला कोणत्या व किती जागा मिळणार हे स्पष्ट झाले नसले, तरी शिंदे गटाची उमेदवारांची यादी मंगळवारी (दि. 26) जाहीर होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक यांनी वृत्तवाहिन्यांना ही माहिती दिली. आपला शिंदे यांच्याशी फोन झाला असून, त्यांनी सर्वांच्या उमेदवार्‍या ठरल्या आहेत. मंगळवारी यादी जाहीर होईल, कामाला लागा, अशा सूचना दिल्याचे मंडलिक यांनी म्हटले आहे.

Back to top button