शाळांना 9 वर्षांनी मिळणार शारीरिक, कला शिक्षक | पुढारी

शाळांना 9 वर्षांनी मिळणार शारीरिक, कला शिक्षक

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : संचमान्यतेच्या निकषांत बदल करून पुढील भरतीपासून शारीरिक शिक्षकांची पदे वाढवली जाणार आहेत. शारीरिक शिक्षकांबरोबर कला शिक्षकही नोकर भरतीत तब्बल 9 वर्षांनी भरले जाणार असल्याने पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, अहमदनगर, म. रा. शारीरिक शिक्षण समन्वय समिती, म. रा. शारीरिक शिक्षण महामंडळ, अमरावती, युवा शारीरिक शिक्षक संघटनांनी यासाठी पाठपुरावा केला. नवीन निकषांत शासनाने विशेष शिक्षकाचा दर्जा पुन्हा बहाल करताना, पूर्ण कार्यभारासाठी 6 वी ते 10 वीचा कार्यभार धरून बायफोकल पद्धतीने पद भरती होणार आहे. प्राथमिकला केंद्रस्तरावर नव्याने शारीरिक शिक्षक पद निर्माण केल्याने प्राथमिक विभागालाही शिक्षक मिळणार आहेत, अशी माहिती संघटनेचे राज्य समन्वयक प्रमोद पाटील यांनी दिली.

शालेयस्तरावर शिक्षक नेमणुकीसाठी प्रत्येक वर्षी शाळांची संचमान्यता करून पदे निश्चित केली जातात. 2014 पासून निकषांत बदल होऊन तुकडीवर आधारित शिक्षक निश्चिती रद्द करून स्तरानुसार वेगवेगळी संचमान्यता होऊ लागली. 2015 पासून शाळांमधील शारीरिक शिक्षकांचा विशेष शिक्षकाचा दर्जा काढून 6 वी ते 8 वी या उच्च प्राथमिकला वर्गीकृत करण्यात आले. त्यामुळे कार्यभार बसत नसल्याने पद भरतीत शारीरिक शिक्षक डावलला जाऊ लागला.

त्यामुळे 2019 च्या शिक्षक भरतीत 0.01 टक्केच शारीरिक शिक्षकांची पद भरती होऊ शकली होती. चालू भरतीतदेखील 36 जागांच्या आसपास उच्च माध्यमिकपर्यंतच्या अतिशय नगण्य जागांची जाहिरात पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. मात्र, शासनाने 15 मार्च रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात संचमान्यतेच्या निकषांत सकारात्मक बदल केले. त्यामुळे पदवीधारकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button