देशाच्या भविष्यालाही आता सुरक्षा कवच! मुलांना विनामूल्य हेल्मेट वाटप | पुढारी

देशाच्या भविष्यालाही आता सुरक्षा कवच! मुलांना विनामूल्य हेल्मेट वाटप

मुंबई : ताजेश काळे : आईबाबांच्या दुचाकीवर पुढे उभे राहून,मागे बसून शाळा गाठणार्‍या 4 ते 8 वयोगटातील चिमुकल्यांसाठी हिरो मोटोकॉर्प कंपनीने खास हेल्मेट तयार केले आहेत. रस्ता सुरक्षेची सामाजिक जबाबदारी ओळखून कंपनीतर्फे महाराष्ट्रासह 10 राज्यांत 50 हजार हेलमेटचे मोफत वाटप सुरू केले आहे. पुण्यातून या मोहिमेचा श्री गणेशा झाला असून गरीब व सामान्य घरातील मुलांच्या शाळांतून या हेल्मेटचे वितरण केले जात आहे.

भारतात दुचाकी वापरणार्‍यांची संख्या जास्त आहे. मात्र, वाहन चालवताना स्वतः व मागे बसलेल्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्याची शिस्त दिसत नाही. साधारण कुटुंबातील मुले पालकांच्या दुचाकीवर बसून शाळेत जातात. या मुलांच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याने अपघात घडल्यास त्यांच्या जीवाला धोका होतो.

वाहन निर्मिती करणार्‍या कंपन्या लहान मुलांच्या डोक्याला फिट बसतील, असे हेल्मेट तयार करीत नाहीत. त्यामुळे हिरो मोटोकॉर्पने सीएसआर फंडातून तब्बल 10 कोटी रुपये खर्च करून 50 हजार हेल्मेटचे उत्पादन व मोफत वाटप करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केल्याची माहिती नवी दिल्लीस्थित ’द इंडियन हेड इंजुरी फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकारी संचालक रणबीर तलवार यांनी खास ‘पुढारी’ दिली.

या उपक्रमात हेल्मेटचे मोफत वाटप करतानाच रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती केली जाईल. शाळांमध्ये मुलांसाठी विविध स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीस दिले जाईल. महाराष्ट्रात शाळांमधून 5 हजार हेल्मेट वाटले जातील.

अपघातात दरवर्षी होतात 75 हजार दुचाकीस्वार ठार

देशातील रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यात 75 हजार दुचाकीस्वारांचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापतीमुळे होतो. द इंडियन हेड इंजुरी फाउंडेशन’ ही संस्था अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्यांवरील उपचार व त्यांच्या पुनर्वसनासाठी काम करते, अशी माहिती या संस्थेचे समन्वयक दिलीपकुमार पांडा यांनी दिली. संस्थेच्या वतीने नवी दिल्ली, जोधपूर, पाटणा येथे अपघातात डोक्याला गंभीर इजा झालेल्यांसाठी पुनर्वसन केंद्र चालवले जाते.

Back to top button