Gold Price : राज्यातील सराफ बाजारात नववर्षाचा उत्सव | पुढारी

Gold Price : राज्यातील सराफ बाजारात नववर्षाचा उत्सव

राजेंद्र पाटील

नवी मुंबई : राज्यातील सराफ बाजारात ग्राहकांनी मोठ्या संख्येने खरेदी करत नववर्षाचा उत्सव साजरा केल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. मुंबईतील सराफ बाजारात संध्याकाळपर्यंत 400 कोटी, तर राज्यात 550 कोटी, असे एकूण 950 कोटींचे सोने खरेदी केले. पहिल्या दिवशी सोने तोळ्यामागे 500 रुपयांनी महाग झाले. त्यामुळे तोळ्याचा दर 63 हजार रुपये होता. गेल्या वर्षभरात तब्बल 70 हजार टन सोन्याची मुंबई सराफ बाजारात विक्री झाल्याची माहिती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. (Gold Price)

शनिवारी, 30 डिसेंबर रोजी मुंबई सराफ बाजारात सोन्याचा दर प्रतितोळे 62,500 एवढा होता. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी सोन्याच्या दरात प्रतितोळ्यामागे 500 रुपयांनी वाढ होऊन 63 हजार रुपयांचा आकडा गाठला. सोने महाग होण्यामागे रशिया-युके्रन आणि हमास-इस्राईल युद्ध कारणीभूत असल्याचे जैन यांनी सांगितले. हे दर नव्या वर्षात आणखी वाढून 70 ते 72 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. (Gold Price)

सोमवारी पहिल्याच दिवशी मुंबई सराफ बाजार तेजीत होता. दिवसभरात 400 कोटींची उलाढाल झाली; तर राज्यात 550 कोटींची झाली. गेल्यावर्षी सराफ बाजारात 70 हजार टन सोने विक्री झाली असून, 54 हजार कोटींची उलाढाल झाल्याचे कुमार जैन यांनी सांगितले. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव आणि कोल्हापूरमध्ये सराफ बाजारात खरेदी-विक्रीचे व्यवहार तेजीत होते. सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता नसून, उलट दर तेजीत राहतील. त्यामुळे खरेदी मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते.

Back to top button