रायगडचे सागर किनारे परदेशी पक्ष्यांनी बहरले | पुढारी

रायगडचे सागर किनारे परदेशी पक्ष्यांनी बहरले

ऋषिता तावडे

अलिबाग : दरवर्षीचे आकर्षण असलेले सीगल, फ्लेमिंगो ठाण्याच्या खाडी किनार्‍यापासून रायगडच्या समुद्र किनारपट्टीपर्यंत हजारोंच्या संख्येने दाखल झाले आहेत. सीगलचे थवेच्या थवे मुरुड, श्रीवर्धन, नागाव?या रायगडच्या किनारपट्टीवर भिरभिरू लागले आहेत. परदेशी पाहुण्यांचा मुक्त संचार आणि त्यांच्या किलबिलाटाने रायगडचे सागरी किनारे गजबजून गेले आहेत. त्यामुळे पर्यटकांना एक आगळी पर्वणी मिळाली आहे.

रशिया आणि युरोपमधून हजारो किलोमीटरचा पल्ला पार करून फ्लेमिंगोंचे (रोहित पक्षी) आगमन समुद्र किनारी झाले आहे. त्यांची लाल चोच, लांबसडक मान, गुलाबी पंख असे लोभस रूप असल्यामुळे या पक्ष्याला अग्निपंख या नावानेही ओळखले जाते. ठाणे आणि नवी मुंबई खाडी किनारा फ्लेमिंगो पक्ष्यांनी गजबजून गेला आहे. 70 ते 80 हजार पक्षी या भागात दिसू लागले आहेत. यातील काही स्थलांतरित तर काही इथेच वास्तव्य करत राहिल्याने इथले झाले आहेत. किनारपट्टीवरील इतर पक्ष्यांमध्ये पाणकोंबडी, विविध बदके व बगळे,
काळा शराटी, करकोचा, सीगल, चक्रवाक अशा देश-विदेशातील विविध पक्ष्यांनी समुद्र किनारपट्टी हळूहळू गजबजू लागली आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्यात आढळणार्‍या 150 जातींच्या पक्ष्यांपैकी 60 ते 70 जातीचे पक्षी स्थलांतरित आहेत. तुरेवाला सर्पगरुड, खरूची, कापशी, शिक्रा असे शिकारी पक्षी, जंगली कोंबडा, भारद्वाज, धनेश, होले असे अनेक मोठे पक्षी, देखणा मोर हे इथले स्थायिक पक्षी आहेत. त्याबरोबरच स्वर्गीय नर्तक आणि शामा हे तर पक्षीप्रेमींसाठींचे इथले आकर्षणच. तिबोटी खंड्या, सुभग, चष्मेवाला कोतवाल, नाचण, दयाळ चातक, पावश्या, राखी वटवट्या, तांबट, कुरटुक, शिंजीर, रनकस्तूर, रक्ताभ सुतार, हरितांग, मिलिंद, सोनेरी पाठीचा सुतार, नवरंग असे अनेक पक्षी येथे आहेत. या पक्ष्यांची चाहूल सर्वांना मोहून टाकणारी आहे. हे पक्षी किनार्‍यांवर आणि सह्याद्रीत दाखल होतात आणि अगदी मे महिन्यापर्यंत किनार्‍याची सोबत करतात. पावसाची चाहूल लागताच हे पक्षी पुन्हा माघारी फिरतात. सुमारे सात ते आठ महिने त्यांचा मुक्काम या किनार्‍यावर असतो. ओहोटीच्या वेळी बाहेर पडणारे छोटे मासे, कीटक, छोटे खेकडे हे त्यांचे प्रमुख अन्न असते.

येथे दुर्मीळ प्रजातीच्या विविध पक्ष्यांचे दर्शन होत आहे. त्यामध्ये थोरला धनेश, मलबारी धनेश, राखी धनेश, मलबारी करडा धनेश यांचा समावेश आहे. दुर्मीळ पांढर्‍या पाठीची गिधाडे व भारतीय गिधाडे येथे दिसत आहेत. रायगड जिल्ह्यात महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियालदेखील सर्वत्र आढळतो. अलिबाग येथील आक्षी आणि रेवस येथील समुद्रकिनारा खाडी प्रदेश 60 हून अधिक स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. राम धरणेश्वर येथे 30 हून अधिक गरुडवर्गीय शिकारी पक्षी आढळतात. एकाच ठिकाणी इतक्या प्रजाती आढळणारे हे एकमेव ठिकाण आहे. सागरगड, सिद्धेश्वर, कनकेश्वर येथे अनेक प्रकारच्या वृक्ष प्रजाती व पक्ष्यांसाठी उत्तम अधिवास आहे. श्रीवर्धन, म्हसळा येथे पांढर्‍या पाठीची व इतर जातीची गिधाडे आणि इतर पक्ष्यांसाठी उत्तम ठिकाण आहे. मुरुड येथील फणसाड अभयारण्यात 190 प्रकारचे पक्षी आढळतात. महाड, माणगाव, पाली, सुधागड, कर्जत व माथेरान समुद्र पक्षी वगळून इतर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे; तर स्थलांतरित तिबोटी खंड्या संपूर्ण जिल्ह्यात आढळतो.

Back to top button