दहशतवादी हल्ल्यांचा ‘इसिस’चा कट होता; सातजणांविरोधात ‘एनआयए’चे आरोपपत्र | पुढारी

दहशतवादी हल्ल्यांचा ‘इसिस’चा कट होता; सातजणांविरोधात ‘एनआयए’चे आरोपपत्र

मुंबई; वृत्तसंस्था : भारतातील काफिरांवर (गैरमुस्लिम) हल्ले करून मुस्लिमांवर होणार्‍या कथित अत्याचारांचा बदला घेण्याचा ‘इसिस’चा कट होता. तसेच भारतात शरियाची राजवट आणण्याचा त्यांचा मनसुबा होता. आपल्या घातक इराद्यांसाठी त्यांनी आयईडी बनवण्याचे काम सुरू केले होते, असे ‘एनआयए’ने ‘इसिस’च्या पुणे मोड्युलविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. एकूण सातजणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, त्यात अनेक बाबींचा ‘एनआयए’ने उलगडा केला आहे.

विशेष न्यायालयासमोर ‘एनआयए’ने सादर केलेल्या आरोपपत्रात सातजणांना प्रमुख आरोपी नमूद केले असून, त्यात एकूण 78 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आरोपपत्रात म्हटले आहे की, या सर्व आरोपींची सूत्रे महम्मद नावाचा हँडलर हलवत असे. त्याच्या सूचनेनुसार या सर्वांनी आयईडी बनवण्यास प्रारंभ केला होता. महम्मद हा स्वतः बॉम्बतज्ज्ञ आहे. या सर्वांनी बॉम्ब बनवण्याच्या साधनांची सांकेतिक नावे ठेवली होती. सल्फ्युरिक अ‍ॅसिडला ‘व्हिनेगार’, अ‍ॅसिटोनला ‘रोझ वॉटर’, हायड्रोजन पॅराक्सॉईडला ‘शरबत’ अशी नावे त्यांनी वापरली.

व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवरून विषारी प्रचार

झुल्फीकार अली बरोडावाला आणि झुबेर शेख यांनी तरुणांना धर्मांध बनवण्याचे काम 2015 पासून सुरू केले होते. ते या आधीच्या ‘एटीएस’च्या तपासातही समोर आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील जंगलात त्यांनी केलेल्या सरावाचाही त्यात उल्लेख आहे. पडघ्यासारखे काही भाग मुस्लिमांचे बालेकिल्ले बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असेही आरोपपत्रात म्हटले आहे. या आरोपींनी काही व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप बनवले होते. त्यात सातत्याने ‘इसिस’ समर्थनाचे मेसेज शेअर केले जायचे. ‘मुस्लिम उम्मा’ आणि ‘उम्मा न्यूज’ अशी या ग्रुप्सची नावे होती. येथे सातत्याने पॅलेस्टाईन, सीरिया आणि ‘इसिस’च्या धोरणाबाबत मेसेजेस शेअर केले जात.

गैरमुस्लिम निशाण्यावर

‘एनआयए’ने म्हटले आहे की, भारतात मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार होत आहेत, अशी माहिती सातत्याने पसरवून मुस्लिमांवरील अत्याचारांना काफीरच जबाबदार असल्याचे ठसवले जात असे. त्यामुळे काफिरांविरोधात घातपाती कारवाया करून बदला घेण्यासाठी युवकांना भडकावण्याचे उद्योग सुरू होते. भारतात शरियाची राजवट आणण्यासाठी हे ‘इसिस’चे पुणे मोड्युल काम करीत होते, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

हे तर देशाविरुद्ध युद्ध

या आरोपपत्रात म्हटले आहे की, आकीफ नाचन, ताबीश नासेर सिद्दिकी आणि अटक केलेल्या इतरांचे ‘इसिस’शी संबंध आहेत व त्यांनी देशात घातपाताचा कट आखण्याची तयारी केली होती. या कारवायांच्या माध्यमातून देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व भंग करण्याचा तसेच देशाविरोधात युद्ध लढण्याचा त्यांचा इरादा होता.

Back to top button