महायुतीत अधिक समन्वयाची गरज; बैठकीत मुख्यमंत्र्यांची अपेक्षा | पुढारी

महायुतीत अधिक समन्वयाची गरज; बैठकीत मुख्यमंत्र्यांची अपेक्षा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही पक्षांमधील समन्वय अधिक वाढायला हवा, अशी अपेक्षा महायुतीतील तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यासाठी आता तिन्ही पक्ष एकत्र कार्यक्रम घेऊन कार्यकर्त्यांना एकत्र आणणार आहेत.

राज्यातील महायुती सरकारमधील शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख घटक पक्षांची बैठक शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला तिन्ही प्रमुख घटक पक्षाचे मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते. खासकरून राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण आंदोलन आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

ते म्हणाले, मराठा समाजाला आपल्या सरकारच्या काळातच आरक्षण देण्यात आले होते. पण, नंतर उद्धव ठाकरे सरकारने ते घालविले. आता पुन्हा हे आरक्षण मिळवायचे असेल तर घाईगडबडीत निर्णय घेऊन चालणार नाही. राज्य मागासवर्ग आयोगामार्फतच त्याची कार्यवाही पुर्ण करावी लागेल. आपल्याला मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता द्यावे लागेल.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण उद्धव ठाकरे यांच्या चुकीने आणि दुर्लक्षाने गमवावे लागले. त्याचा फटका मराठा समाजाला बसल्याचा आरोप केला. त्याला दुजोरा देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते. त्यांनी समन्वय ठेवून मराठा आरक्षणाची लढाई लढणे आवश्यक होते. पण ते कमी पडल्याची टीका केली. तसेच तीनही घटक पक्षातील समन्वय अधिक वाढवा यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.

मंत्री, आमदारांनी दौरे करावेत

मराठा आंदोलन आणि इथून पुढे लोकसभा निवडणुकीपर्यंत या तिन्ही पक्षामधील समन्वय अधिक वाढवण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच सरकारने घेतलेले निर्णय आणि नवीन प्रकल्पांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मंत्री आणि आमदारांनी दौरे करावेत. गाव पातळीवर असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवा यासाठी प्रयत्न करावेत असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Back to top button