Diwali 2023 : मुंबईत शाळांना दिवाळीची सुट्टी ११ दिवस; पण शिक्षकांचा विरोध | पुढारी

Diwali 2023 : मुंबईत शाळांना दिवाळीची सुट्टी ११ दिवस; पण शिक्षकांचा विरोध

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील शाळांनी येत्या १० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत ११ दिवसांची दिवाळी सुटी घ्यावी आणि २३ नोव्हेंबरपासून नियमित शाळा सुरु करण्याचे आदेश शिक्षण निरीक्षकांनी मुंबईतील शाळांना दिले आहेत. दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी कमी केल्याने शिक्षकांनी विरोध करत हा आदेश मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.

शाळांनी शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्टया ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घेत वर्षभराचे नियोजन करावे अशा सूचना करत शिक्षण निरीक्षकांनी सुट्टीच्या नियोजनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शाळांनी उन्हाळी व दिवाळी दीर्घ सुट्टी कमी करुन त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ या सणात शिक्षण निरीक्षकांच्या परवानगीने समायोजित करु शकतात असे आदेश यापूर्वीच दिले आहेत. त्याप्रमाणे दिवाळीची सुटी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील दिवाळी सुट्टी १० ते २२ नोव्हेंबर अशी ११ दिवसांची असणार आहे. २३ नोव्हेंबरपासून शाळा नियमितपणे सुरु कराव्यात अशा सूचनाही आदेशात दिल्या आहेत.

या आदेशला शिक्षकांनी आक्षेप घेत तो रद्द करावा अशी मागणी केली आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात किंवा त्याही अगोदर वर्षाच्या सुरुवातीला शिक्षक संघटनांसोबत सभा घेऊन पुढील शैक्षणिक वर्षातील सुट्टीचे नियोजन शिक्षण निरीक्षकांनी करणे अपेक्षित आहे.
तसेच जूनमध्येही शाळा सुरु झाल्यानंतर या वर्षातील शैक्षणिक सत्रातील सुट्ट्यांचे नियोजन पाठवणे गरजेचे होते. मुंबईतील शिक्षण निरीक्षकांनी ३० ऑक्टोबरला दिवाळी सुट्टीबाबतचे आदेश काढत सुट्टी ११ दिवसांची दिली आहे. अनेक शाळांनी जून/जुलैमध्ये दिवाळी सुट्टीचे नियोजन केल्याप्रमाणे पंजाब, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ, बिहार तसेच अन्य राज्यात मूळ गावी जात असलेल्या शिक्षकांनी व पालकांनी ४ महिने अगोदर रेल्वेचे आरक्षण केले आहे. अनेक शाळांनी नियोजन करत ८ नोव्हेंबरपासून शाळांना सुटी दिली आहे.
आता शिक्षण विभागाने ११ दिवसांची सुटी दिली आहे. हा आदेश देत सुटीचा कालावधी कमी केला आहे. हा आदेश रद्द करावा अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.

दिवाळी सुट्टीत एकवाक्यता नसल्याने गोंधळ

शालेय शिक्षण विभागाने दिवाळीच्या सुट्टीबाबत एकवाक्यता आणलेली नसल्याने अनेक शाळांत वेगवेगळ्या तारखांची सुट्टी जाहीर केली आहे. अनेक शाळांनी आपल्या सोयीनुसार दिवाळीसुटीनंतर शाळांची घंटा वाजणार आहे. दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी ठरवण्याबाबत आता पत्रक काढल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे अगोदर सुटी दिलेल्या शाळांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मुंबई विभागातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना ९ नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्टी दिली आहे तर काही शाळांमध्ये ६ नोव्हेंबरपासून सुट्टी देण्यात आल्याची माहिती पालकांनी दिली आहे.

Back to top button