पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने आपले जीवन संपवल्याची माहिती मिळत आहे. मराठा आंदोलनात सक्रीय असलेले सुनील बाबुराव कावळे (वय ४५) यांनी आज बांद्रा पूर्व मुंबईत जीवन संपवले. सुनील कावळे हे जालना जिल्ह्यातील चिकनगाव, (ता. अंबड) येथील आहेत. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद खेरवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.
हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाकरिता मराठा समाजातील लोकांनी २४ ऑक्टोबरला मुंबईमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच चिठ्ठीच्या शेवटी त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे.
संबंधित बातम्या :
दरम्यान, सुनील कावळे यांनी जीवन संपवल्याच्या घटनेवर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी, 'खचून जाऊ नका. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका' असे आवाहन मराठा बांधवांना केले आहे. त्यांनी याबाबत X वर पोस्ट केली आहे. "माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका! सरकारला विनंती की, यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही."
मराठा युवकांनी जीवन संपवू नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे. असा इशारा विनोद पाटील यांनी दिला आहे. त्यांनी सुनील कावळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हेही वाचा :