सरकारच्या छाताडावर बसून मराठा आरक्षण घेणार : जरांगे-पाटलांची ग्वाही | पुढारी

सरकारच्या छाताडावर बसून मराठा आरक्षण घेणार : जरांगे-पाटलांची ग्वाही

वडवणी; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांचे बळी जाता कामा नयेत. वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथील तरुणी स्वाती गोंडे हिचे बलिदान व्यर्थ जाऊन दिले जाणार नाही. मी एक-दोन दिवसात सरकारला बोलून तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यास भाग पाडणार आहे. सरकारच्या छाताडावर बसून मराठा समाजाला आरक्षण पदरात पाडून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही अशी ग्वाही मराठा समाज आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज दिली. वडवणी तालुक्यात मोरवड येथील आयोजित सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक सभेत ते बोलत होते.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताशी घेऊन अंतरवली सराटी गावातून महाराष्ट्रभर रान पेटवले आहे. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाची धग गावागावात, घराघरात पोहोचली आहे. ४० दिवसात आरक्षण देण्याचे सरकारने जाहीर केल्यानंतर गावोगावी साखळी उपोषणे सुरू आहेत. वडवणी तालुक्यातील ९० टक्के गावात साखळी उपोषणे सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन सकल मराठा बांधवांसोबत संवाद साधत आहेत. १४ ऑक्टोंबर रोजी मराठा समाजाची संवाद सभा अंतरवाली सराटी येथे शंभर एकर जागेमध्ये होणार आहे. या सभेची पूर्वतयारी म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यात सकल मराठा समाजाला निमंत्रित करण्यासाठी मनोज जरांगे पाटील विविध ठिकाणी सभा घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी त्यांची तेलगाव, वडवणी तालुक्यातील मोरवड आणि धारूर तालुक्यातील कारी येथे जाहीर सभा झाली.

मोरवड येथील सभेला संबोधित करताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण किती गरजेचे आहे, ते मिळवण्यासाठी कायद्यामध्ये कशी तरतूद आहे आणि शासन मराठा समाजाला कसं झुलवत ठेवत आहे हे विविध उदाहरणे देऊन पटवून दिलं. मराठा समाजाला शासन जाणीवपूर्वक आरक्षणापासून दूर ठेवत आहे. आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाची झालेली वाताहत त्यांनी यावेळी मुद्देसूद मांडली.

लोकशाही मार्गाने आंतरवली सराटी गावात उपोषण सुरू असताना आंदोलकांवर लाठीमार केल्याने डोके फोडणाऱ्या सरकारवर त्यांनी सडकून टीका केली. सरकार वेळ मागत होतं आम्ही तो वेळ दिलेला आहे. मागितल्यापेक्षा जास्त वेळ दिला असल्यामुळे आता सरकारवर जिम्मेदारी आहे. येत्या १४ तारखेला महिना संपत आहे. त्यानंतर दहा दिवसाचा वेळ आहे. १४ तारखेला सराटी अंतरवली मध्ये शंभर एकर जागेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठे एकवटणार आहेत. महिला मंडळीची या सभेसाठी मोठी गर्दी राहणार आहे. या सभेचा विचार करून शासनाने पुढील चार दिवसात जीआर पास करावा आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 आरक्षणासाठी प्रयत्न करणार

गावोगावी लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद हा असाच शेवटपर्यंत टिकला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाचे विद्यार्थी जीव गमावत आहेत. मात्र यापुढे कोणत्याही विद्यार्थ्यांचा बळी आरक्षणासाठी जाता कामा नाही. वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथील उच्चशिक्षित एम फार्मसी करीत असलेली मुलगी मराठा आरक्षणाचा बळी ठरली आहे. मात्र तिचं बलिदान वाया जाऊन देणार नाही. तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी भाग पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या एक-दोन दिवसात शासनाला चिंचोटी येथील स्वाती गोंडेच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

बीड परळी राज्यमार्ग भगवेमय

मनोज जरांगे पाटील यांची सभा बीड परळी राज्य मार्गालगट मोरवड फाट्यावर १६ एकर जागेमध्ये संपन्न झाली. ही सभा होणार असल्यामुळे बीड परळी राज्य मार्गावर वडवणी ते तेलगाव या रस्त्यावर जागोजागी भगवे झेंडे लावण्यात आले होते. संपूर्ण रस्ताच भगवामय दिसून येत होता.

चिंचोटी येथील पाच मुलींनी दिले निवेदन

वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथील एम फार्मसीचे शिक्षण घेत असलेल्या स्वाती गोंडे या मुलीचा मराठा आरक्षणापायी मृत्यू झाला. या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून जरांगे पाटील यांना सकल मराठा समाजाच्या पाच मुलींनी निवेदन दिले. यावेळी तिला या सभेत जाहीर श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

आता थोडाच मराठा समाज राहिलाय त्यालाही घ्या…..

महाराष्ट्रातील पाच कोटी मराठा समाजापैकी खानदेश, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रातील इतर भागातील बहुतांशी मराठा समाज अगोदरच ओबीसी मध्ये गेलेला आहे. आता फक्त मराठवाड्यातील आणि महाराष्ट्राच्या इतर थोड्या भागातील मराठा समाज ओबीसी मध्ये जाणे बाकी आहे त्यांनाही मराठा ओबीसी प्रमाणपत्र देऊन टाका अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी शासनाकडे केली.तुम्ही

कोणता आधार घेतला होता…?

मराठा समाजाला ओबीसीत जाण्यासाठी आधाराची गरज आहे असं मला काही नेते म्हणतात.. परंतु त्या नेत्यांना माझा सवाल असा आहे की, तुमची जात ओबीसी मध्ये घालण्यासाठी तुम्ही कोणता आधार घेतला होता..? ते अगोदर स्पष्ट करा असेही यावेळी जरांगे पाटील यांनी आवर्जून सांगितले.

14 तारखेला झाडून पुसून या

येत्या 14 तारखेला अंतरवाली सराटी गावात शंभर एकर जागेमध्ये होणाऱ्या सभेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून घराघरातील मराठा बांधव येणार आहेत या सभेसाठी शालेय विद्यार्थी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे कोणीच घरी थांबू नका झाडून पुसून या आणि स्वयंसेवक म्हणून काम करा महिलांचे संरक्षण करा आणि सभा यशस्वी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले

Back to top button