ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार : मनोज जरांगे-पाटील | पुढारी

ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार : मनोज जरांगे-पाटील

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  एखादी जात आरक्षणात यावी, यासाठी ते मागास असावेत हा निकष आहे. न्या. गायकवाड आयोगाने केलेल्या सर्वेक्षणात आम्ही मागास असल्याचे सिद्ध झाले आहे. ओबीसींची एकही जात मागास सिद्ध नाही. ते केवळ व्यवसायाने आरक्षणात गेले आहेत. आमचाही व्यवसाय शेती हाच आहे. त्यामुळे आम्हालाही या निकषावर आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केली. तसेच ओबीसीतून आरक्षण घेण्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.

आरक्षणासाठी आम्ही सरकारला वेळ दिलेला नाही. त्यांनी आमच्याकडून वेळ मागून घेतला आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण द्यावेच लागणार आहे. आरक्षणाची ही अंतिम लढाई आहे, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला. जरांगे-पाटील यांनी बुधवारी मुंबईत मराठा संघटनांच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच विविध वाहिन्यांना मुलाखती दिल्या.

मराठा आरक्षणाशी संबंधित सर्व अहवाल न्यायालयासमोर आलेच नाहीत. व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिले असेल, तर आमच्या अर्ध्या भावांनाच आरक्षण आहे. आम्हाला का दिले नाही? विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांना कुणबी आरक्षण आहे. त्यांचा व्यवसाय शेती आहे म्हणून ते दिले आहे; मग आमच्याकडे काय समुद्र आहे का? आम्हीही शेतीच करतो ना? मग आम्हाला का आरक्षण देत नाही, असा सवाल त्यांनी केला.

आंदोलन मोडून काढण्याची चूक करू नका

जरांगे-पाटील यांनी सरकारला आंदोलन मोडून काढण्याची चूक पुन्हा करू नका, असा इशारा देतानाच या आंदोलनाला शरद पवारांची फुस असल्याचा आरोप भाजपकडून केला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मराठे स्वत:ची भाकरी घेऊन येतात, दोन रुपये देऊन जातात. तुम्ही आरोप सिद्ध करून दाखवा, मी दोन पावले मागे येतो, असे आव्हान त्यांनी दिले. तसेच छगन भुजबळ यांना आमचा विरोध नाही, त्या प्रवृत्तीला विरोध असल्याचा निशाणाही त्यांनी साधला.

123 गावे गोदापट्ट्यात आहेत. या गावांनी मराठ्यांची सेवा करायचे ठरवले आहे. सभेसाठी काही लोकांनी शेत दिले. 22 गावांत 21 लाख रुपये जमा झाले. जातीसाठी त्यांनी कष्टाचे पैसे दिले. आम्ही माय-बाप मराठ्यांचे रक्तपिऊ शकत नाही, समाजाला डाग लागता कामा नये. आम्ही कोणाकडेही पैसे मागितले नाहीत, असे ते म्हणाले.

पुढचे आंदोलन सरकारला झेपणारे नसेल

आमचे पुढील आंदोलनही शांततेतच होणार; पण ते सरकारला झेपणार नाही. हे शेवटचे आंदोलन असेल. आम्ही किती दिवस आंदोलने करायची. आमच्या पुढच्या पिढ्यांनीही तेच करायचे का? आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला.

आरक्षण मिळाले पाहिजे : चंद्रकांत पाटील

पुणे : सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन सुरू असून, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण हायकोर्टात टिकवले होते. नंतर आमचे सरकार गेले पुढे काय झाले ते तुम्हाला माहिती आहे. आता क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टात आहे. जे कोणालाही जमले नाही ते फडणवीस यांनी केले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले ते उच्च न्यायालयात टिकवले. सर्वोच्च न्यायालयात वर्षभर टिकवले. त्यानंतर मात्र सरकार बदलले. आरक्षण न्यायालयात टिकावे, यासाठी सरकार प्रभावीपणे मुद्दे मांडत आहे.

जरांगे-पाटील यांची उद्या बारामतीत सभा

बारामती : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाचे हत्यार उपसत राज्यभर रान उठविणारे मनोज जरांगे-पाटील शुक्रवारी बारामतीत येत आहेत. येथील तीन हत्ती चौकात त्यांची सभा होणार आहे. बारामतीतील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. मराठा समाजाने गेल्या तीन दिवसांपूर्वीच बैठक घेत बारामतीत जरांगे-पाटील यांची सभा घेण्याचे नियोजन केले होते.

Back to top button