Malik vs Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी बनावट नोटांचे रॅकेट चालवले; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

Malik vs Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी बनावट नोटांचे रॅकेट चालवले; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
Published on
Updated on

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना पदाचा गैरवापर करत बनावट नोटांचे रॅकेट चालवले. नोटबंदीनंतर हे रॅकेट चालविणाऱ्यांना अभय दिले. तसेच त्यांच्या काळात कुख्यांत गुंडांना काही महामंडळांचे अध्यक्ष बनविले. दाऊदच्या हस्तकांशी त्यांचा थेट संबंध होता, इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात या हस्तकाला थेट प्रवेश दिला, असे गंभीर आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज ( दि. १० ) पत्रकार परिषदेत केला.( Malik vs Fadnavis)

मलिक यांनी कवडीमोल दराने अंडरवर्ल्ड डाॅन दाऊदच्या माणसांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला होता. त्याला मलिक यांनी उत्तर देताना ज्या काळात हा व्यवहार झाला त्यावेळी मी मंत्री नव्हतो. तसेच हे आरोप म्हणजे मी जी लढाई लढतोय त्यावरून लक्ष हटविण्यासाठी केलेला प्रयत्न आहे, असा दावा केला.समीर वानखेडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जुने संबंध आहेत. एक अधिकारी १४ वर्षांपासून मुंबईत नियुक्तीला आहे. तो सातत्याने सोयीच्या पोस्टवर काम कसे करतो याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे, त्यांना वाचविण्यासाठी हे आरोप होत आहेत, असेही मलिक म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणतात, नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डच्या लोकांशी संबंध आहेत. मात्र, जे मोठे मोठे गुंड आहेत. त्या लोकांशी मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी सरकारी महामंडळांचे अध्यक्ष केले. मुन्ना यादव नावाचा व्यक्ती नागपूरमधील मोठा गुंड आहे. त्याच्यावर खून आणि अन्य गंभीर गुन्हे आहेत. तो फडणवीस यांचा राजकीय सहकारी आहे. मुन्नाला बांधकाम कल्याण महामंडळाचा अध्यक्ष केला. तो तुमच्या गंगेत पवित्र झाला.

हैदर नावाच्या व्यक्तीला मौलाना आझाद फायनान्स कार्पोरेशनचा अध्यक्ष फडणवीस यांनी केला. हैदरची दुसरी पत्नी बांगलादेशी आहे. त्याची चौकशी मालाड पोलिसांनी केली. हे प्रकरण बंगाल पोलिसांकडे गेले. त्यावेळी संबधित महिलेची कागदपत्रे बोगस असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी मालाड पोलिस गुन्हा नोंदवत होते. त्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन केला आणि गुन्हा नोंद होऊ दिला नाही. बांगलादेशींना आश्रय देणाऱ्यांना फडणवीस कसे काय आश्रय देतात? फडणवीस यांच्या कार्यकाळात शहरातील अनेकांना परदेशातून कुख्यात गुंडांचे फोन येत होते. खंडण्या मागितल्या जात होत्या. मात्र, पोलिस ही प्रकरणे दाबत होते, असे आराेपही त्‍यांनी केले.

( Malik vs Fadnavis) नोटबंदीनतर बनावट नोटांचे रॅकेट

नोटबंदीनंतर बनावट नोटांच्या रॅकेटबाबतही मलिक यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, 'नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केली. तेव्हा मोदी म्हणाले, नोटबंदीमुळे दहशतवाद संपेल, बनावट नोटा, काळा पैसा बाहेर येईल. मात्र, त्याचे पुढे काय होईल माहीत नाही; पण देशभरात २०००, ५०० च्या नोटा पकडल्या जाऊ लागल्या. पंजाब, मध्य प्रदेश, तामिळनाडूत कारवाया झाल्या. पण महाराष्ट्रात ८ ऑक्टोबर, २०१७ पर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रछायेत हा कारभार सुरू होता.  त्यानंतर १४ ऑक्टोंबरला गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर छापा टाकून १४ कोटी, ५६ लाखांचा बनावट नोटांचा साठा जप्त केला. हा छापा समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली टाकला गेला. हे प्रकरण दाबले गेले. या प्रकरणात १४ कोटी, ५६ लाख पकडले गेले. याप्रकरणी पुण्यातून इम्रान आलम शेख, रियाज शेख यांना पकडले गेले. मात्र,जप्त केलेली रक्कम रक्कम ८ लाख ८० हजार दाखवून प्रकरण दाबले गेले. पकडले गेलेले आरोपींचा थेट पाकिस्तानशी संबंध होता. मात्र, त्यांना काही दिवसांत जामीन झाला. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावरील असूनही एनआयएकडे तपास जात नाही. हे प्रकरण एकूणच संशयास्पद आहे. हे रॅकेट चालवणारे लोक सरकारशी संबधित होते. या प्रकरणातील इम्रान शेख हा हाजी अराफत शेख याचा भाऊ आहे. अराफत शेख याला अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष केले गेले. तुम्ही मुन्ना यादवला पद देता, बांगलादेशींना आश्रय देणाऱ्यांना पद देता?' असा सवालही मलिक यांनी यावेळी केला.

( Malik vs Fadnavis) रियाज भाटी पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कसा?

मलिक यांनी रियाज भाटी यांच्यावरून गंभीर आरोप केले . ते म्हणाले, 'रियाज भाटी हा अंडरवर्ल्ड डाॅन दाऊदचा माणूस आहे. त्याला पंतप्रधानांच्या दौऱ्यात थेट प्रवेश दिला गेला. त्याचे पंतप्रधानांसोबत फोटो काढले गेले. रियाज भाटी हा विना पासपोर्ट विमानतळावर २०१५ अटक केली होती. तेव्हापासून रियाज भाटी हा फरार आहे. फडणवीस रियाज भाटीच्या मदतीने वसुली रॅकेट चालवत होते. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात जाण्यासाठी केंद्रीय आणि राज्य पातळीवरील यंत्रणा पूर्णपणे पडताळणी करतात. मात्र, रियाज भाटी हा दाऊदचा माणूस असून तो पंतप्रधानांसोबत कसा गेला. तो व्हायआयपी कक्षात कसा गेला? तो देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेला, त्याला त्यांचे संरक्षण होते.', असा आराेपही मलिक यांनी केला.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news