क्रूझवरील ड्रग्ज पार्टीत ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाल्यानंतर Munmun Dhamecha हिने आता पुन्हा याचिका दाखल केली आहे. ऑर्थर रोडमधून सुटका झाल्यानंतर आता तिला मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची सक्ती केली आहे. मात्र, मला हे गैरसोयीचे असून दिल्लीतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावू शकते, तशी परवानगी द्यावी अशी मागणी तिने केली आहे.
मुंबईतील क्रूझवर एनसीबीने पार्टीवर छापा टाकून शाहरूख खानचा मुलगा आर्यनसह Munmun Dhamecha, अरबाज मर्चंट, नूपुर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ मर्चंट यांना अटक केली होती. त्यांच्याकडून १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या आणि एक लाख ३३ हजार रोख रुपये जप्त केले होते. या सर्वांना जामीन मिळाला. मुनमून धमेचा ही मूळची दिल्लीची असल्याने तिला जामीन देण्यात अडचणी होत्या. मुंबई उच्च न्यायालयाने तिला जामीन देताना अनेक अटी घातल्या आहेत. या अटींविरोधात आता तिने कोर्टात याचिका दाखल केली असून या अटी शिथिल कराव्यात अशी मागणी केली आहे.
एनसीबीच्या मुंबईमधील कार्यालयापेक्षा दिल्ली कार्यालयात हजेरी लावण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. मी दिल्लीला राहते. त्यामुळे मला दिल्ली एनसीबी कार्यालयामध्ये जाणे सोयीचे ठरेल असे तिने याचिकेत म्हटले आहे. मुंबईत माझे कुणीही नातेवाईक नाहीत. त्यामुळे एनसीबी कार्यालयात आठवड्याला हजेरी लावणं गैरसोयीचे आहे असे मुनमूनने म्हटले आहे.
मुनमूनला आर्यन आणि अरबाज मर्चंटसोबतच २८ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर झालेला. मात्र तिला जामीन देण्यास मुंबईस्थित व्यक्ती नसल्याने तिची सुटका सर्व कागदोपत्री पूर्तता केल्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती.
जामीन देताना न्यायालयाने तिला अट घातली होती की, दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान मुंबई एनसीबी कार्यालयामध्ये हजेरी लावणे अनिवार्य आहे. तपास यंत्रणांना माहिती दिल्याशिवाय तिला कुठे प्रवास करता येणार नाही. प्रवास करायचा झाल्यास कुठे आणि कसा प्रवास करणार आहे हे सांगितल्याशिवाय मुंबई बाहेर जाऊ नये, असेही कोर्टाने म्हटले आहे. माझ्यावर जामीन देताना टाकण्यात आलेली बंधन ही माझ्या प्रोफेशनल तसेच सामाजिक जीवनावर परिणाम करणारी आहेत, असा दावा तिने केला आहे. मुनमून ही मूळची मध्य प्रदेशची असून दिल्लीमध्ये काम करते.
आवश्यकता असल्यास आपण आपल्या कामाची आणि सर्व प्रवासाची माहिती मध्य प्रदेश किंवा दिल्ली एनसीबीच्या कार्यालयात हवी तेव्हा आणि हव्या त्या पद्धतीने देण्यास तयार असल्याचेही मुनमूनने म्हटले आहे. मुंबईबाहेर जाऊ देणे, दिल्लीत एनसीबीच्या कार्यालयात हजेरी ग्राह्य ठरणे आणि कुठे आणि कसा प्रवास करणार याबद्दलची माहिती तपास यंत्रणांना न देणे अशा तीन प्रमुख मागण्या मुनमूनने केल्या आहेत.
हेही वाचा :