एसटी स्थानकातून धावल्या खासगी गाड्या, संप चिघळण्याची शक्यता | पुढारी

एसटी स्थानकातून धावल्या खासगी गाड्या, संप चिघळण्याची शक्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेत शासनाने मंगळवारी रात्री एसटीच्या स्थानकांमधून खासगी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बुधवारी म्हणजेच आजपासून स्वारगेट स्थानकातून सकाळी आठ वाजल्यापासून खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या सोडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वारगेट स्थानकातून सोडण्यात येणाऱ्या या खासगी बसचे भाडे एसटीच्या दरात असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची येथे गर्दी होत आहे. दरम्यान, प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी स्वारगेट येथील स्वच्छतागृहे बंद केली आहेत. तसेच आता एसटी स्थानकामधून खासगी गाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे संपवा आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

एसटी स्थानकातून सुटणार्‍या खासगी गाड्या

– (दर तासाला- प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार)
– स्वारगेट एसटी स्थानक -20 गाड्या- (कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, बेळगाव)
– शिवाजीनगर (वाकडेवाडी) – 20 गाड्या (अकोला, जालना, रावेत)
– पुणे स्टेशन – 20 गाड्या (मुंबई, दादर, बोरिवली, कांदिवली)
– पिंपरी – 20 -(कोकण भागातील रत्नागिरी, दापोली, खेड, सावंतवाडी, महाड)
– पुण्यातून एकूण – 60 गाड्या
– पिंपरीतून दर तासाला 20 खासगी गाड्या सुटणार

पीएमपीच्या गाड्याही ग्रामीण भागात धावणार

एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल लक्षात घेत, प्रशासनाने पीएमपीलाही महापालिका हद्दी शेजारील ग्रामीण भागात बससेवा पुरविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संप काळात पीएमपी आता ग्रामीण भागात आजपासून प्रवाशांना सेवा पुरविणार आहे. एसटीच्या पुण्यातील तीनही स्थानकांतून उद्यापासून (दि.10) खासगी वाहतूक दारांच्या बस प्रवाशांच्या सोयीकरिता सोडण्यात येणार आहे. त्याचे सर्व नियोजन आरटीओ आणि खासगी वाहतूकदारांकडे आहे. त्याचे भाडे एसटीच्या दरात असणार आहे. पुण्यातील तीनही स्थानकातून प्रत्येकी 20 गाड्या सुटणार आहेत. काही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिस बंदोबस्त असणार आहे.

– रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, एसटी पुणे विभाग

सोमवारी खासगी बस संघटनेच्या वतीने आम्ही पुणे शहरातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी प्रवाशांसाठी जादा 40 बसेस पाठविल्या आहेत. या सर्वांचे दर एसटीच्या दराप्रमाणे असणार आहेत.

– बाबा शिंदे, अध्यक्ष, राज्य प्रवासी माल वाहतूक संघटना.

आम्ही एसटीच्या भाडे दरात दर तासाला 20 गाड्या यानुसार स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, पिंपरी स्थानकातून प्रवाशांना सेवा पुरविणार आहे. यावर आरटीओचे नियंत्रण असणार आहे. येथून होणारी ही प्रवासी वाहतूक ही थेट असणार असून, टप्पा वाहतूक नसेल. एसटीचे दर आम्हाला परवडणारे नाहीत. किंवा एसटी कर्मचार्‍यांनाही दुखविण्याचा आमचा हेतू नाही. मात्र, प्रवाशांच्यासाठी आम्ही ही सेवा पुरवत आहोत.

– किरण देसाई, कार्याध्यक्ष, पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : गावात लाईट आली आणि साजरा झाला खरा दीपोत्सव | Diwali2021 | #pudharionline

Back to top button