Eknath Shinde | शिंदेंच्या आमदार, खासदारांच्या मतदारसंघांतील सर्व्हे काय सांगतो? | पुढारी

Eknath Shinde | शिंदेंच्या आमदार, खासदारांच्या मतदारसंघांतील सर्व्हे काय सांगतो?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या १५ खासदार आणि ४० आमदारांच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. खासगी कंपन्यांकडून मतदारसंघांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, यात काही आमदार आणि खासदार यांचे मतदारसंघ अडचणीत आहेत. तेथील आमदार आणि खासदार यांच्यासोबत बसून आढावा घेतला जात आहे. (Eknath Shinde)

मागील जूनमध्ये भाजपसोबत सत्तेवर आलेल्या शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदारांचा मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महायुतीतील राजकीय समीकरणे बदलली. यातच अजित पवार यांच्या महायुतीतील प्रवेशानंतर ते मुख्यमंत्री होतील, असे उघडपणे बोलले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाने वेगळी रणनीती आखली आहे. भाजपच्या किती जागा निवडून येतील, त्यापेक्षा शिंदे गटाचे कसे जास्त खासदार आणि आमदार निवडून येतील, यावर आपली राजकीय किंमत आगामी सत्तेच्या राजकारणात ठरेल, याचा अंदाज मुख्यमंत्री शिंदे यांना आला आहे. त्यामुळे त्यांनी आपले फासे टाकायला सुरुवात केली आहे. त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची तयारी त्यांनी केली आहे.

शिंदे गटात ४० आमदार असून, त्यांना भरभरून निधी शिंदे यांनी दिला आहे. तरीही त्या आमदारांच्या जागा अडचणीत आहेत. त्यांना शिंदे यांनी तंबी दिली आहे. ४० आमदारांच्या मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले पाहिजे, असे त्यांनी आमदारांना बजावले आहे. विरोधकांनी केलेल्या आरोपांमुळे शिंदे गटाच्या काही आमदारांची प्रतिमा डागाळली आहे. त्यामुळे शिंदेंपुढे लोकसभेची निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे. (Eknath Shinde faction)

लोकसभा निवडणुकीतील शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या कामगिरीची तुलना भाजपच्या नेतृत्वाकडून केली जाईल. अजित पवार गटाने आपली ताकद दाखवली तर मुख्यमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे जाईल, असे भाजपच्या वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटाला स्वतःची ताकद दाखवावी लागेल. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. गजानन कीर्तिकर यांच्यासारखे काही विद्यमान खासदार निवडणूक न लढविण्याच्या मनःस्थितीत आहेत. काही खासदार यांच्यावर ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांच्या मतदारसंघात शिंदे गटासाठी अडचणी आहेत. त्यामुळे यातील काही मतदारसंघ भाजप लढवेल, यावरही खल सुरू आहे

Back to top button