Janmashtami 2023 : आज गोविंदाचा ‘थर’थराट; ‘स्पेन’ येथूनही गोविंदा पथक मुंबईत दाखल | पुढारी

Janmashtami 2023 : आज गोविंदाचा 'थर'थराट; 'स्पेन' येथूनही गोविंदा पथक मुंबईत दाखल

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहरासह ठाणे, पालघर, नवी मुंबई आदी भागातील प्रतिष्ठेच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथक सज्ज झाली आहेत. आज (दि.७) मुंबईकरांना गोविंदाचा ‘थर’थराट बघायला मिळणार असून यंदा जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाकडून दहा थरांचा विक्रम रचला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गोपाळकाल्याकडे महामुंबईतील करोडो नागरिकांचे लक्ष लागले आहे. (Janmashtami 2023)

स्पेन वरूनही गोविंदा पथक मुंबईत दाखल

दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई शहरसह ठाणे व पालघर जिल्ह्यातील आयोजक सज्ज झाले आहे. अनेक ठिकाणी 1 लाखापासून 25 लाखापर्यंत बक्षिसे ठेवण्यात आले असून या कार्यक्रमाला हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांसह अन्य सेलिब्रिटीना आमंत्रण देण्यात आले आहे. त्याशिवाय हिंदी मराठी वाद्यवृंद कार्यक्रमही ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. पुढील वर्षी लोकसभेसह विधानसभा व महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्यामुळे यंदा भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सवाला विशेष महत्त्व दिले आहे.

दहीहंडी उत्सवात सर्वांचे लक्ष वेधून घेणारे गोविंदा पथक उंच मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज (दि.७) सकाळपासूनच ही गोविंदा पथक मुंबई पासून हंडी फोडण्यास सुरुवात करणार आहेत. मध्यरात्री उशिरापर्यंत गोविंदा पथकांचा हा थरथराट नागरिकांना बघता येणार आहे. यंदा मुंबईसह ठाण्यातील प्रमुख गोविंदा पथकासह महिलांचे ही गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्पेन वरूनही गोविंदा पथक मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे आज संपूर्ण मुंबईचा आजूबाजूचा परिसर बोल बजरंग बली की जय… या जय घोषाने दुमदुमली जाणार आहे.

Janmashtami 2023 : अग्निशमन व हॉस्पिटलही सज्ज !

गोविंदा दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे रचत असताना अपघात होण्याची दाट शक्यता असते. यात अनेक गोविंदा गंभीर जखमी होतात. यात काहींचा मृत्यू होतो. त्यामुळे अशा गंभीर गोविंदांवर तातडीने औषध-उपचार व्हावा यासाठी मुंबई महापालिकेसह सरकारी हॉस्पिटल सज्ज झाली आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या जखमी गोविंदांवर तातडीने उपचार करावा असे निर्देश पालिका प्रशासनाकडून डॉक्टरांना देण्यात आले आहे. यासाठी डॉक्टरची टीमही तैनात ठेवण्यात येणार आहे. तर दुसरीकडे ज्या भागात मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे या ठिकाणी अग्निशमन दलासह रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली आहे.

पोलिसांचाही कडक बंदोबस्त !

दहीहंडी उत्सवासाठी नागरिकांची उसळणारी गर्दी लक्षात घेऊन, उत्सवाच्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यात राखीव पोलीस दलाचे ही जवान तैनात ठेवण्यात येणार आहेत. त्याशिवाय रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनाही सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत

2022 मध्ये दहा थर लावण्यास जय जवानला अपयश !

दहीहंडी दिवशी जास्तीत जास्त थर लावून विक्रम करण्यासाठी गेल्या महिन्या दीड महिन्यापासून गोविंदा पथकांचा सराव सुरू होता. जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने 2022 मध्ये दहा थर लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यात त्यांना यश आले नाही. परंतु यावेळी दहा थराचा त्यांच्याकडून विक्रम रचला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सराव करत असताना त्यांनी दहा थर लावल्याचे सांगण्यात येत आहे.

Janmashtami 2023 : गोविंदांना विमा कवच !

दहिहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटना होण्याची शक्यता असते, त्यामुळे राज्यातील गोविंदांना विमा कवच देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या क्रीडा खात्यातर्फे राज्यातील 50 हजार गोविंदांना विम्याचे कवच दिले आहे.  गोविंदांना विमा संरक्षण देण्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून प्रति गोविंदा 75 रुपयाचा विमा हप्ता याप्रमाणे 37 लाख 50 हजार रुपये इतका निधी विमा कंपनीस देण्यात आला आहे. मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास दहा लाख रुपयांचा विमा देण्यात येणार आहे.

हेही वाचा 

Back to top button