गुरुनाथ नाईक : विश्‍वविक्रमी गूढकथांचा बादशहा | पुढारी

गुरुनाथ नाईक : विश्‍वविक्रमी गूढकथांचा बादशहा

मराठी साहित्याचा सुवर्णकाळ सुरू असताना बाबुराव अर्नाळकर यांच्यानंतर धाडसाने गूढकथा लिहून त्यांचे वाचकांना वेड लावण्याचे श्रेय गुरुनाथ नाईक यांना जाते. त्यांनी स्वतःचा असा वाचकवर्ग निर्माण केला. गुरुनाथ नाईक यांनी सुमारे 1200 कादंबर्‍या झपाटल्याप्रमाणे लिहिल्या. 60 च्या दशकात महिन्याला सात ते आठ मराठी कादंबर्‍या प्रकाशित होत असत. त्यात एक-दोन कादंबर्‍या गुरुनाथ नाईक यांच्या असायच्या. दर महिन्याला वाचक त्यांच्या नव्या कादंबरीची वाट पहायचे.

गुरुनाथ नाईक गूढकथेपुरतेच मर्यादित राहिले नाहीत. त्यांनी वेगवेगळे कथा प्रकार हाताळले. एकाच वेळी शिलेदार कथा, गरुड कथा, सागर कथा, धुरंधर कथा, रातराणी कथा, शब्दवेधी कथा, गोलंदाज कथा, बहिर्जी कथा, भय कथा असे वेगवेगळे कथा प्रकार त्यांनी हाताळले. शिलेदार कथा लष्करी संस्कृतीतील हेरकथा असत.

गरुडकथा ही सहसा मुंबईतील अंडरवर्ल्ड विरोधी बुरखेधारीची कथा असे, रातराणी ही स्त्रीसाहस कथा असे, सागरकथा ही सागरी जीवनातील साहसकथा असे. गोलंदाज दरोडेखोरीच्या पार्श्वभूमिवरील, शब्दवेधी ही संस्थानिकांच्या काळातील रॉबिनहूडसारखी धाडसकथा, बहिर्जी ही शिवकालिन हेरकथा असे.

गुरुनाथ नाईक तीन दिवसात 100 पानी कादंबरी हातावेगळी करायचे. दिवसातून ते केव्हाही लिहायला बसायचे. एकाच वेळी ते झपाटल्यासारखे किमान 3 तरी प्रकरणे लिहून काढायचे.

गुरुनाथ नाईक मुळात पत्रकार होते. विविध दैनिकांचे संपादक पद त्यांनी भूषवले. औरंगाबाद येथे असताना ते अजिंठा या अतिशय जुन्या बहुदा मराठवाड्यातील पहिल्या आणि प्रतिष्ठित दैनिकाचे कार्यकारी संपादक होते. नंतर त्यांनी जालन्यात तत्कालिन आमदार विलास खरात यांचे दुनियादारी हे दैनिक सुरु केले. स्व. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या एकमतमध्येही ते होते. गुरुनाथ नाईक यांचे लेखन इतर लेखकांपेक्षा हटके होते. त्यांच्या कथेत वर्णनात्मक भाग कमी आणि घटनाप्रधान भाग अधिक असल्याने प्रसंग लगेचच गती घेत असे. त्यांच्या कथेतील प्रसंगांत रटाळपणा नव्हता.

गुरुनाथ नाईकांच्या लेखनमाला लोकप्रिय ठरल्या. शिलेदार कथा म्हटले की, कॅप्टन दीप, लेफ्टनंट शेख, जमादार कदम, हवालदार नाईक, गरुड म्हटले की अविनाश चव्हाण आणि रंजना तसेच भय्या आठवत असे. गोलंदाज म्हटला की, उदयसिंग चव्हाण आणि हरिहर पाली हे ठरलेले होते.

शब्दवेधीचा सूरज, बहिर्जीतील बहिर्जी नाईक या पात्रांनी वाचकांच्या मनात घर केले होते. शिलेदार कथांमधील लष्करी पार्श्वभूमी आणि पाकिस्तानी-चिनी हेरांची कारस्थाने यांच्या जगाची पहिल्यांदा ओळख करून दिली ती नाईक यांनीच.

गुरुनाथ नाईक यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. मात्र त्यांना नशिबाला दोष देताना कुणी पाहिलेले नाही. स्वतःची दुःखे त्यांनी जगापुढे कधीच मांडली नाहीत.
एखाद्या रेशीम कोशाप्रमाणे बंदिस्त असलेले त्यांचे व्यक्‍तिमत्व शेवटपर्यंत गूढच राहिले.

थक्‍क करणारा गूढकथाकार

सिद्धहस्त लेखनाने मराठीतील कथाविश्वाचे दालन अधिक समृद्ध करणारा लेखक म्हणजे गुरुनाथ नाईक. कथा हा साहित्यप्रकार मराठी साहित्याला परिचयाचा असला तरी त्यात गूढ, भय आणि रहस्य कथेचे एक आगळेवेगळे स्थान निर्माण करण्याची किमया नाईक यांनी प्रतिभासंपन्न लेखणीच्या जोरावर केली. विक्रमी संख्येने मराठी गूढ, भय आणि रहस्य कथा लिहून त्यांनी मराठी कथाविश्वात जी भर घातली आहे त्याची नोंद गिनीज विश्वविक्रमात देखील झाली आहे. गोवा मुक्तीलढ्याचा वारसा आणि परंपरा लाभलेल्या घराण्यात जन्मलेल्या नाईक यांनी लिहिलेल्या कथांनी मोठ्या वाचक वर्गाला खिळवून ठेवले.

ज्या गतीने त्यांनी साहित्यलेखन केले त्याचा विचार केल्यास आजही थक्क व्हायला होते. त्यांच्या लेखनाला जीवनातील विविध क्षेत्रांची पार्श्वभूमी लाभलेली दिसते. सुमारे अर्धशतकी काळात बाराशेच्या आसपास कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या आहेत. यावरून त्यांच्या सक्रीय लेखनाचा व्याप लक्षात येतो.

पन्नास वर्षांच्या लेखन काळात अनेक पिढ्यांच्या वाचनसंस्कृतीचे भरणपोषण त्यांच्या लेखनाने केले. विशेषकरून पाश्चात्य साहित्य विश्वात दिसून येत आलेले रहस्य, गूढ आणि भय कथेचे स्वतंत्र दालन वाचकांच्या हाती सुपूर्द करणार्‍या नाईक यांच्या कार्याला मानाचा मुजरा.
– प्रा. चिन्मय मधू घैसास,
सहायक प्राध्यापक, मराठी विभाग, गोवा विद्यापीठ

Back to top button