राज्याच्या औद्योगिक विकासाची ब्ल्यू प्रिंट बनवा : राज्यपाल रमेश बैस | पुढारी

राज्याच्या औद्योगिक विकासाची ब्ल्यू प्रिंट बनवा : राज्यपाल रमेश बैस

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी उद्योगपती, व्यापारी संस्थांसह संबंधितांची उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. तसेच महिला उद्योजकांसाठी विशेष औद्योगिक पार्क बनविण्यात यावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी राज्य सरकारला केले आहे.

मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये राज्याच्या पहिल्या उद्योग पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या सभारंभात राज्यपाल बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्याचा पहिला ‘उद्योगरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार टाटा समूहाचे पितामह रतन टाटा यांना शनिवारी त्यांच्या निवासस्थानी देण्यात आला. आजच्या कार्यक्रमात टाटा ट्रस्टचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना उद्योगरत्न पुरस्काराचे स्मृतिचिन्ह देण्यात आले, तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांना उद्योगमित्र, महिला उद्योजिकेला देण्यात येणारा ‘उद्योगिनी’ पुरस्कार किर्लोस्कर समूहाच्या संचालिका गौरी किर्लोस्कर यांना देण्यात आला. सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार देण्यात आला. आजच्या कार्यक्रमात उद्योग रोजगार मित्र या उपक्रमाच्या शुभारंभाची घोषणा करण्यात आली.

आपलेपणा, बारामती आणि फडणवीसांचा विश्वास

आदर पूनावाला व गौरी किर्लोस्कर हे दोघेही पुणेकर असल्याचा अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणात म्हणाले. तत्पूर्वी,पूनावाला यांनी, महाराष्ट्रात आपलेपणा वाटतो. सरकार आपलेपणाने सर्व सोयीसुविधा पुरविते. त्यामुळे लसींचे पुढचे सर्व प्रकल्प आपण महाराष्ट्रातच सुरू करणार असल्याचे जाहीर केले. हाच धागा पकडत अजित पवारांनी हे प्रकल्प महाराष्ट्रात व पुण्यातच होतील, असे म्हटले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी, दादा पुण्यात म्हणत होते तेव्हा मला वाटले की ते आता बारामतीतच वगैरे बोलतात की काय, पण समृद्धी महामार्गामुळे आता छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भदेखील डेस्टिनेशन आहे. तिथेही उद्योग येतील. अर्थमंत्री म्हणून अजित पवार त्यासाठी साथ देतील, असा विश्वास असल्याची पुस्ती फडणवीसांनी जोडली.

Back to top button