नवाब मलिक : फडणवीसांच्या व्हीडिओला ड्रग्ज पेडलरचे फायनान्स | पुढारी

नवाब मलिक : फडणवीसांच्या व्हीडिओला ड्रग्ज पेडलरचे फायनान्स

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सोमवारी खळबळ उडवून दिली. जयदीप चंदुलाल राणा या ड्रग्ज पेडलरचा देवेंद्र फडणवीस यांच्या आश्रयाखाली अमली पदार्थांचा व्यापार सुरू होता, असे सांगत याच राणाने अमृता फडणवीस यांच्या ‘रिव्हर साँग’ या व्हिडीओला आर्थिक मदत केल्याचा दावा मलिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मलिक यांनी राजकीय बॉम्ब टाकल्याने महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी टिपेला जाण्याची चिन्हे आहेत.

पत्रकार परिषदेत मलिक यांनी सुरुवातीला अमृता फडणवीस यांचे जयदीप राणासोबतचे छायाचित्र ट्वीट केले. त्याचबरोबर या फोटोचा आधार घेत त्यांनी ‘चला आज भाजप आणि ड्रग्ज पेडलर यांच्या नात्यावर चर्चा करुया’ असा उल्लेख या ट्वीटमध्ये करीत खळबळ उडवून दिली.

अमृता फडणवीस यांच्यासोबत छायाचित्रात दिसणारी व्यक्ती ‘जयदीप राणा’ हा ड्रग पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला, मात्र त्यांनी अमृता यांच्यावर थेट टीका केली नाही. जयदीप राणा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंधांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही मलिक यांनी यावेळी केली. दरम्यान, जयदीप राणाला एनसीबीने जूनमध्ये अटक केली होती. तो सध्या साबरमती कारागृहात असल्याची माहिती मलिक यांनी दिली.

नवाब मलिक यांचे आरोप

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सचिन वाझेप्रमाणेच नीरज गुंडे नावाची व्यक्ती होती. नीरज गुंडे याच शहरात राहतो. तो फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील बदली आणि पोस्टींगची कामे पाहायचा. मुख्यमंत्री निवास, कार्यालय तसेच सर्व अधिकार्‍यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी त्याला होती. पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा.

देवेंद्र फडणवीस जेव्हा नवी मुंबई, पुण्याकडे जायचे, सायंकाळी नीरज गुंडे त्यांच्या घरी हजेरी लावायला जायचे.
सरकार बदलल्यानंतर हाच नीरज गुंडे केंद्रीय संस्थामध्येे फिरताना दिसत आहे.
ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांच्या इशार्‍यावर सुरु आहे.
समीर दाऊद वानखेडे गेल्या 14 वर्षांपासून या शहरात वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करतोय, त्यांच्याही बदलीमागेही फडणवीस आहेत.

है तैयार हम!

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग माफियांशी संबंध आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला असता, मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत ,असा पलटवार फडणवीस यांनी केला.
फडणवीस यांच्या प्रत्युत्तराला मलिक यांनी ट्विटरवर है तैयार हम असे टॅग करत आव्हान दिले.

Back to top button