उत्तर मुंबई, मुलुंडसह भाजप नगरसेवकांच्या प्रभागांची फाळणी! | पुढारी

उत्तर मुंबई, मुलुंडसह भाजप नगरसेवकांच्या प्रभागांची फाळणी!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील प्रभाग फेररचनेच्या कच्च्या आराखड्यात सुधारणा होणार असली तरी, या आराखड्यात भाजप नगरसेवकांच्या प्रभागांची मोठ्याप्रमाणात फाळणी केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे कांदिवली, बोरिवली, दहिसर या उत्तर मुंबई कडील भागासह मुलुंड आदी भागातील प्रभागांमध्ये मोठा बदल झाल्याचे समजते.

फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. यात प्रभाग फेररचनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. प्रभाग फेररचनेचा तयार करण्यात आलेला कच्चा आराखडा महापालिकेने निवडणूक आयोगाला सादर केला आहे.

हा आराखडा तयार करताना लोकसंख्या लक्षात घेण्यात आली असली तरी, पश्चिम उपनगरातील दहिसर, कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, वांद्रे, पूर्व उपनगरांतील मुलुंड, घाटकोपर, शहर भागातील गिरगाव, चिरा बाजार, ग्रँटरोड, ताडदेव, मलबार हिल आदी भागातील प्रभागांच्या हद्दी बदलण्यात आल्याचे समजते. या भागात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत.

प्रभाग हद्दीत झालेल्या बदलामुळे काही मतदारांच्या प्रभागांमध्येही बदल होणार आहे. प्रभागांमधील एखाद्या भागातील मतदार भाजप अथवा अन्य पक्षाला मतदान करणारे असतील अशा मतदारांची प्रभाग फेररचनेमध्ये राज्यकर्त्यांकडून फाळणी करण्याची शिफारस करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मग राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी त्यांच्या शिफारशीनुसारच प्रभाग फेररचना होत असल्याचे सांगण्यात येते.

Back to top button