नीट मध्ये मुंबईची कार्तिका नायर देशात प्रथम | पुढारी

नीट मध्ये मुंबईची कार्तिका नायर देशात प्रथम

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : नीट निकालात पहिल्या क्रमांकावर मुंबईकर कार्तिका नायर, तेलंगणाचा मृणाल कुट्टेरी आणि दिल्लीचा तन्मय गुप्ता या तीन विद्यार्थी पाहिले आले आहेत. या तीनही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट)चा निकाल एनटीए कडून सोमवारी जाहीर झाला. यामध्ये तीन विद्यार्थ्यांनी देशात पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांपैकी प्रथम कोण याबाबत प्रवेशाच्या वेळी सूत्राने ठरविले जाणार असल्याचे राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले आहे.

या परीक्षेसाठी 16 लाख 14 हजार 777 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 15 लाख 44 हजार 275 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी आठ लाख 70 हजार 74 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये 427 अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

परीक्षेचा निकाल ऑक्टोबरमध्ये जाहीर होणार होता. मात्र दोन विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती यावळी उच्च न्यायालयाने निकालाला स्थगिती दिली होती. यामुळे निकाल रखडला होता. अखेर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर करण्याची सूचना केली.

यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी 25 जणांना निकाल राखून ठेवण्याबाबत विनंती केली होती. यानंतर अखेर सोमवारी हा निकल जाहीर करण्यात आला. यात 15 विद्यार्थ्यांचा निकाल गैरप्रकारामुळे राखून ठेवण्यात आला. या परीक्षेत खुल्या प्रवर्गासाठी पुढील प्रवेशसाठी किमान 50 पर्सेंटाइल गुण असणे बंधनकारक आहेत. तर राखीव प्रवर्गाला ही अट 45 पर्सेंटाइल इतकी आहे.

राज्याची भरारी

राज्यातील हृदय मोहिते देशात पाचवा तर वैश्णवी सारडा देशात 17वी आली आहे आणि आणि मुलींमध्ये देशात दुसरी आली आहे. राज्यातील अनिरुद्ध दयाळा हा देशात 23 वा आला आहे.

प्रवेशात बदल

देशव्यापी कौन्सिलिंग प्रक्रिया सुरू होणार आहे. यावर्षी प्रवेश प्रक्रियेत बदल झाला असून आर्थिकदृष्ट्या अक्षम आणि ओबीसी प्रवर्गासाठी देशव्यापी कोट्यामध्येही आरक्षण लागू राहणार आहे.

Back to top button