चायनीज गणेश मूर्तीवर बंदी आणा : आशिष शेलार यांची मागणी | पुढारी

चायनीज गणेश मूर्तीवर बंदी आणा : आशिष शेलार यांची मागणी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बाजारामध्ये चायनीज गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात येऊ पाहत आहेत, त्यावर सरसकट बंदी आणा, अशी आग्रही मागणी आज मुंबई महापालिकेत झालेल्या गणेशोत्सवाबाबतच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांनी दिली.

गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे सर्वच स्तरावर तयारीची लगबग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिका मुख्यालयात संयुक्त बैठक घेऊन गणेश मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळे आणि गणेश भक्तांच्या विविध अडचणी व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्यासह महापालिका अतिरिक्त आयुक्त श्रीम. अश्विनी भिडे व गणेशोत्सव समन्वय महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, सरचिटणीस सुरेश सरनौबत व अन्य पदाधिकारी मूर्तिकार संघाचे पदाधिकारी, भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे आदी सर्व उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना आमदार अँड. आशिष शेलार यांनी सांगितले की, गणेशोत्सव मंडळांकडून 1 हजार रुपये अनामत रक्कम घेण्याचा निर्णय यावर्षी महापालिकेने केला होता, त्याला आमचा विरोध होता, त्याबाबत चर्चा केल्यानंतर यावर्षी केवळ शंभर रुपये अनामत रक्कम घेण्याचे पालिकेने मान्य केले आहे. ही अत्यंत समाधानकारक बाब आहे.

तसेच सरसकट पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घालून कारखान्यांवर धाडसत्र, अशी कारवाई महापालिका करणार होती त्यालाही आमचा विरोध होता. याबाबत चर्चा करण्यात आली. पर्यावरण पूरक गणेशमूर्ती असाव्यात हा आग्रह चांगला आहे, मात्र एकाएकी निर्णय घेऊन एवढा मोठा बदल करता येणार नाही. त्यासाठी मूर्तीकारांयना काही वेळ द्यावा लागेल ,त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चायनीज गणेशमुर्त्या येत असून त्यावर सरसकट बंदी आणण्यात यावी अशी मागणी करण्यात आली, त्याबाबत महापालिकेने तयारी दाखवली आहे. तसेच काही गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवर जुने खटले सुरू आहेत ते मागे घेण्यात यावे, अशी मागणी आम्ही केली. तर गणेशोत्सव साजरा करताना, गणपती आणताना व विसर्जन मिरवणुका लक्षात घेऊन वाहतूक नियोजन करावे, रस्त्यावर खड्डे असू नये, अशी मागणी आम्ही केल्याचे आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

दरम्यान, यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव काळ असल्याने गणेशोत्सव विसर्जन स्थळी गणेश भक्तांना मोदक अथवा पेढा प्रसाद म्हणून देण्याचे नियोजन करावे असेही पालिकेला सूचविल्याचे आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

बैठकीतील सविस्तर मुद्दे

१. गणेश मूर्तिकार / मूर्ती साठवणूकदार यांना परवानगीसाठी असलेली रु.१०००/- असलेली अनामत रक्कम कमी करून ती रु. १००/- करण्यात आली.
२. गणेशोत्सवाच्या विसर्जन काळामध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने गणेश भक्तांचे तोंड गोड करण्याची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात येईल.
३. विसर्जनाचे सर्व मार्ग व त्यावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील.
४. चिनी बनवटीच्या मूर्तींवर आळा तसेच प्रतिबंध घालण्यासाठी पाउले उचलली जातील.
५. प्रत्येक गणेश मंडळाकडे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी दिवसातून ३ वेळा महापालिकेच्या वतीने साफसफाई केली जाईल.
६. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे भरविण्यात येतील.
७. गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधी विसर्जन मार्गाचा आढाव घेऊन योग्य ती खबरदारी घेतली जाईल.
८. गत वर्षी विसर्जन मिरवणुकितील विसर्जनास नेण्यात येणाऱ्या वाहनांवर / गणेश मिरवणुकितील गणेश भक्तांवर पोलीस खटले दाखल केलेले आहेत. ते काढण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल.
९. शहरात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची संख्या वाढवली जाईल.
१०. पीओपी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर त्यांचे योग्य पद्धतीने विघटन केले जाईल.
११. गणेश विसर्जनावेळी काही अडथळे आल्यास त्याकडे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आदेश पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

Back to top button