एनसीबी चे पथक दिल्लीला परतले | पुढारी

एनसीबी चे पथक दिल्लीला परतले

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कॉर्डेलिया क्रूझ रेव्ह पार्टीवरील एनसीबीच्या कारवाईतील पंच प्रभाकर साईल याने प्रतिज्ञापत्र सादर करून केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेले एनसीबीचे विशेष पथक दिल्लीला परतले आहे. या पथकाला पंच प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांची चौकशी करता आली नाही. त्यामुळे एनसीबीने केलेल्या विनंतीनुसार मुंबई पोलिसांनी प्रभाकर साईल याला एनसीबी चौकशीला हजर राहण्याचा निरोप पाहोचवला आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे पाच सदस्यीय पथक बुधवारी तपासासाठी मुंबईत आले होते. या पथकाने एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह या प्रकरणाशी संबंधित पाच अधिकारी आणि तीन खासगी व्यक्तींची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्यानंतर काही दस्तऐवज आणि कागदपत्रे ताब्यात घेऊन एनसीबीचे पथक दिल्लीला परतले आहे.

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बॉलीवूडचा किंग खान शाहरूख खान याचा मुलगा आर्यन याची 27 दिवसांनी शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता घरवापसी झाली आहे. त्याला पोलीस बंदोबस्तात घरी सोडण्यात आले. त्यापूर्वी कारागृह प्रशासनाने आपली कागदोपत्री कारवाई पूर्ण करून घेत तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी आर्यनला तुरुंग प्रशासनाने 9 हजार 750 रुपये परत केले आहेत.

न्यायबंदी असताना आर्यन खान याला त्याच्या कुटुंबाकडून 15 हजार रुपयांची मनीऑर्डर मिळाली होती. यातील एकूण 5 हजार 250 रुपये आर्यनने खर्च केले. त्यामुळे तुरुंगातून बाहेर जाण्यापूर्वी तुरुंग प्रशासनाने उरलेल्या रकमेची मोजणी करून आर्यनला 9 हजार 750 रुपये परत केले आहेत.

पुन्हा चौकशीसाठी येण्याची शक्यता

एनसीबीचे पथक महासंचालकांना चौकशीचा प्राथमिक अहवाल देईल. त्यानंतर आवश्यकता भासल्यास येत्या काही दिवसांत पुन्हा मुंबईत चौकशीला येण्याची शक्यता आहे.

Back to top button