मंत्री नवाब मलिक : एनसीबीविरोधात मुख्यमंत्री लिहिणार मोदींना पत्र | पुढारी

मंत्री नवाब मलिक : एनसीबीविरोधात मुख्यमंत्री लिहिणार मोदींना पत्र

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अमली पदार्थप्रकरणी कारवाई झालीच पाहिजे, पण एनसीबीची छापासत्रे संपूर्ण बॉलीवूडलाच बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे चुकीचे असून याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी दिली.

नवाब मलिक यांनी बुधवारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात त्यांच्याकडील पुरावे सादर केले. या प्रकरणी मुंबई पोलीस गुन्हा नोंदवून चौकशी करणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली. एनसीबीचे छापासत्र व त्यातून होणारी मांडवली यासंदर्भात मुंबई पोलीस लवकरच गुन्हा नोंद करतील, असे मलिक म्हणाले.

बॉलीवूडच्या तब्बल 26 कलाकारांवर आजपर्यंत एनसीबीने एक तर छापा टाकला किंवा अमली पदार्थ व्यवहारप्रकरणी चौकशी केली आहे. यातून मीडिया ट्रोल झाली आणि कलाकारांंना बदनाम केले गेले. ज्यांची एनसीबी चौकशी करते, त्यांना अमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी शिक्षा काही होत नाही, असे मलिक यांनी सांगितले.

छापासत्राने बॉलीवूडची बदनामी

हॉलीवूडनंतर मुंबईतील बॉलीवूड हा जगातील मोठा चित्रपट उद्योग आहे. केवळ चित्रपट कलाकारच नव्हे, तर लाखो लोकांचा रोजगारही या उद्योगावर अवलंबून आहे. देशाच्या दरडोई उत्पन्नात चित्रपट उद्योगाचा मोठा वाटा आहे. तसेच मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या संस्कृतीचा जगात प्रसार होतो. अमली पदार्थप्रकरणी कारवाई करण्याबाबत आमचे दुमत नाही. मात्र संपूर्ण चित्रपट उद्योग अमली पदार्थाच्या आहारी गेलेला आहे, हे चित्र जाणीवपूर्वक उभे केले जाते, ते चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

Back to top button