मुंबई : दोन मेट्रो मार्गांची स्थानके जोडणार विमानतळ | पुढारी

मुंबई : दोन मेट्रो मार्गांची स्थानके जोडणार विमानतळ

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मेट्रो ३ आणि ७-”अ” या दोन मेट्रो मार्गांच्या स्थानकाची जोडणी विमानतळाला मिळणार असल्याने भविष्यात आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचणे अधिक जलद आणि सोपे होणार आहे. या दोन्ही मार्गांवरून विमानतळ गाठता येईल.

मेट्रो ७-अ हा अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असा मार्ग आहे. हा मार्ग ०. ९८० कि . मी. अंतरात उन्नत , तर २.१९५ कि. मी. अंतरात भुयारी आहे. एकूण १० स्थानकातील नऊ स्थानके उन्नत,तर १ स्थानक भूमिगत आहे. सहा हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. मेट्रो ३ आणि ७-अ मार्गांचे विमानतळ स्थानक हे परस्परांना समांतर असेल. त्यामुळे प्रवाशांना दोन्ही स्थानकात सहज ये-जा करता येईल. मेट्रो ३ च्या माध्यमातून थेट कुलाबा येथे राहणारी व्यक्ती जलदगतीने, वाहतूक कोंडीत न अडकता विमानतळापर्यंत येऊ शकते. त्याच प्रमाणे मेट्रो ७-अ मार्गाने अंधेरी आणि परिसरातील लोक वाहतूक कोंडी टाळून विमानतळ गाठू शकतात. एकाच वेळी दोन मेट्रो मार्ग विमानतळाच्या दिशेने येणारे असल्याने लोकांची मोठी सोय होणार आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी अतिजलद मेट्रो मार्गिकेने जोडले जाणार असल्याने विमानतळापर्यंत मेट्रोचे जाळे तयार होईल. मेट्रो ३ च्या आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानकाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. याच स्थानकात भारतातील सर्वात मोठा सरकता जीना बसवण्यात आला आहे. १४ सरकते जीने आणि ११ जीने या स्थानकात आहेत. हे स्थानक अन्य स्थानकांच्या तुलनेत जमिनीत खूप खोल आहे. विमानतळ स्थानक असल्याने स्थानकावर प्रवाशांची गर्दी असू शकते. सकाळी आणि संध्याकाळी १६ हजार प्रवासी या स्थानकावर चढ – उतार करू शकतात. याच वेळेत दर तासाला चार हजार प्रवासी ट्रेन मध्ये चढतील, तर तेवढेच प्रवासी उतरतील, असा अंदाज आहे.

Back to top button