उद्धव ठाकरेंनी सावरकरांच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करावी | पुढारी

उद्धव ठाकरेंनी सावरकरांच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करावी

धाराशिव/ मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आमचे आदर्श स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार किंवा अन्य कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकांचे धडे तुम्ही पाठ्यक्रमातून काढू शकाल. पण, लोकांच्या मनातून त्यांना कधीही काढता येणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारला ठणकावले. त्याचवेळी या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ष्ट करावी, अशी मागणीही केली.

ठाकरे यांनी केवळ सत्तेसाठी समझोता केला असा आरोप करून, मी ठाकरे यांना विचारू इच्छितो की ते आता काँग्रेसच्या मांडीला मांंडी लावून बसणार का? सावरकरांचा अपमान ते सहन करणार का, असा सवाल फडणवीस यांनी केला. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी कर्नाटक सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला.

आज महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्नच्या चर्चा करीत आहेत. माझा त्यांना प्रश्न आहे की, हाच तो कर्नाटक पॅटर्न आहे का? उद्धव ठाकरे ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, तेच आता वीर सावरकरांचा धडा काढायला निघाले, धर्मांतर विरोधी कायदा रद्द करतात. आता त्यावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय, अल्पसंख्याकांच्या अनुनयाला तुमची मान्यता आहे का? खुर्चीसाठी याबाबतीत समझोता करणार का, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे, असे फडणवीस म्हणाले.

निर्णय काँग्रेसच्या अंगलट येईल; रणजित सावरकर यांची टीका

पणजी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राष्ट्रीय स्वंंयसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्यावरील धडे कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने वगळल्याचा निर्णय काँग्रेसच्या अंगलट येणार आहे, असा इशारा सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी दिला आहे. पीटीआयशी बोलताना रणजित म्हणाले की, विद्यार्थ्यांना सावरकरांच्या विचारांपासून वंचित ठेवण्याचा काँग्रेसचा डाव आहे. तथापि, सावरकरांवर विपुल साहित्य उपलब्ध आहे. कन्नडमध्येही आम्ही त्यांचे साहित्य प्रसारित करणार आहोत. त्यामुळे काँग्रेसच्या निर्णयाचा काही फरक पडणार नाही. उलट, हा निर्णय काँग्रेसच्या अंगलटच येईल.

Back to top button