युतीतील वाद टाळण्यासाठी समिती : एकनाथ शिंदे | पुढारी

युतीतील वाद टाळण्यासाठी समिती : एकनाथ शिंदे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना आणि भाजपमधील वाद टाळण्यासाठी दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री उशिरा आपल्या पक्षातील आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत सांगितले. एकीकडे युतीत मिठाचा खडा पडू नये म्हणून काळजी घेणार असल्याचे सांगतानाच शिवसेनेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा करत गृहित न धरण्याचा सूचक इशाराही मित्रपक्षाला दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच पक्षाचे आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्राबाहेर शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी संघटना बळकट करण्यासाठी राज्यप्रमुखांच्या कामाचा आढावा घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले. काश्मीर भेटीवर असताना उत्तर भारतातील शिवसेनेच्या राज्यप्रमुखांची भेट घेतली तेव्हा पक्षाचा मुख्य नेता आपल्याला भेटायला आल्याने ते राज्यप्रमुखही चकित झाले होते, असे शिंदे यावेळी म्हणाले. बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार देशाच्या कानाकोपर्‍यात नेऊन पुढे काम करण्याचा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला.

Back to top button