CM Eknath Shinde : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटींच्या निधीस मान्यता : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

CM Eknath Shinde : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटींच्या निधीस मान्यता : मुख्यमंत्री शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील शिवसेना आणि भाजप सरकारने सततच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्यास नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषीत केले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १५०० कोटींच्या निधीस मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (दि.१३) मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते.

आतापर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई शासनाकडून देण्यात आली असली, तरी अल्प पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळालेली नाही. यासाठी अल्पशा पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 1500 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात येईल, असे शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांना दिली जाणाऱी मदत दुप्पट करण्यात आली आहे. नुकसानीसाठी क्षेत्र मर्यादा २ एकरवरून ३ एकर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत दिली जाणार आहे. राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्रामसेवकांच्या मानधनात १० हजार रूपयांची वाढ करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी तत्काळ करण्यात येणार आहे. राज्यातील सरकार शेतकऱ्यांचा सरकार आहे. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन आम्ही काम करत आहे. घरात बसून काम करत नाही,असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. सर्व्हेमध्ये आमच्या सरकारला नागरिकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे आमची जबाबदारी आता वाढली आहे. सरकार मोदींच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. त्यामुळे राज्यात डबल इंजिनमुळे विकासकामांना वेग आला आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button