डिसेंबरअखेर समृद्धी महामार्ग सुरू होणार मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही; समृद्धी महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याचे उत्साहात लोकार्पण | पुढारी

डिसेंबरअखेर समृद्धी महामार्ग सुरू होणार मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही; समृद्धी महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याचे उत्साहात लोकार्पण

शिर्डी (नगर), पुढारी वृत्तसेवा: आमच्या सत्तातरांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने देत आमचा मार्ग मोकळा केला. आम्ही समृद्धीचा मार्ग मोकळा केला, असे सांगत डिसेंबरअखेर समृद्धीचा शेवटचा टप्पा पूर्ण करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्यातील (शिर्डी- भरविर, ता. इगतपुरी) लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, खा. हेमंत गोडसे, आ. रमेश बोरणारे, आ. मोनिकताई राजळे, आ. किशोर दराडे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, माजी मंत्री शिवाजी कर्डीले, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, माजी आ. वैभव पिचड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, आदीसह मान्यवर उपस्थित होते. या दरम्यान दुसर्‍या टप्प्यातील रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.

मंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही दिलेला शब्द पाळतो, शब्दाला जागणं आमचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य आम्ही पार पाडत आहोत. आम्ही जाहीरपणे शब्द देऊन शब्द पाळतो, आम्ही लोकांप्रमाणे घरात बसून शब्द देत नाही. त्यामुळे सत्य काही लपत नाही. आमची खुली किताब आहे. आम्ही लोकांना दाखवलेली स्वप्न पूर्ण केली. आम्हाला अनेकांनी विरोध केला. लोकांनी आंदोलने केली. त्याच लोकांनी या समृद्धीसाठी जागा दिल्या.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी प्रचंड मेहनत घेतली. केंद्र सरकारने भरीव मदत केली. त्यामुळे आजचा शेतकरी खर्‍या अर्थाने समृद्धीतून ‘समृद्ध’ बनणार आहे. या माध्यमातून 13 प्रकल्प राबविले जाणार आहे, त्यामधून शेती, पर्यटन, औद्योगिकरण याला प्रचंड चालना मिळून विकास साध्य करता येणार आहे.

उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचा विकास करायचा असेल तर राज्यातील विकसनशील शहर हे मागास भागाशी जोडणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी समृद्धीची निर्मिती झाली. या रस्त्याचे सर्वात जलद गतीने भू- संपादन केले. उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेऊन हा प्रकल्प होऊ देणार नाही तर शरद पवार नगरमध्ये बैठक घेऊन म्हणाले होते की, हे शक्य नाही करत येणार नाही. ज्या गावातील लोकांनी आम्हाला जमीन देण्यास नकार दिला त्यांनीच आम्हाला जमिनी दिल्या. अन् देशांत 720 किमीचा ग्रीन फिल्ड समृद्धी महामार्गाच्या जमिनी अवघ्या नऊ महिन्यात संपादित केल्या. या महामार्गासाठी पहिल्या जमिनी ह्या धोत्रा गावातील लोकांनी दिल्या. त्यामुळे समृद्धीच्या प्रकल्पातील नवीन नगर विकासामध्ये धोत्रा गावात विकास केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जुलैत विमानतळाच्या टर्मिनल्सचे भूमिपूजन

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आपल्या भाषणात म्हणाले की, शिर्डीत रेल्वे, समृद्धी महामार्ग आला. त्यामुळे भाविक वाढले. विमानतळही आले. मात्र विमानतळाचा आगामी विकास करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, शिर्डीच्या विकासासाठी जुलै महिन्यातच नव्या टर्मिनल्सचे भूमिपूजन केले जाणार असल्याची ग्वाही दिली.

Back to top button