मुंबई : व्यापार्‍यांचा सरकारला अल्टिमेटम | पुढारी

मुंबई : व्यापार्‍यांचा सरकारला अल्टिमेटम

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील कोरोना रुग्णांची घटलेली संख्या पाहता निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीसाठी व्यापार्‍यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या आठवडाभरात लेव्हल 3मधीलनिर्बंध शिथिल करून मुंबईत लेव्हल 1 किंवा 2चे निर्बंध लावले नाहीत, तर आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारविरोधात मतदान करण्याचा इशारा व्यापार्‍यांनी दिला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले, तरी या तीनही पक्षांविरोधात बहिष्काराचे अस्त्र वापरू, अशी माहिती फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी दिली.

विरेन शाह म्हणाले की, गेल्या पाच आठवड्यांत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना संक्रमणाची टक्केवारी पाच टक्क्यांखाली गेली आहे. सरकारच्या नियमावलीप्रमाणे मुंबईत लेव्हल 1 किंवा 2चे निर्बंध असावेत. मात्र मुंबई मनपाने लेव्हलचे 3चे निर्बंध कायम ठेवल्याने मुंबईकरांसह व्यापार्‍यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आठवड्यातील फक्त पाच दिवस तेही सायंकाळी 4 वाजेपर्यंत व्यवसाय करणे व्यापार्‍यांना परवडत नाही. ग्राहकांअभावी उलाढाल खालावल्याने दुकानाचे भाडे, कर्मचार्‍यांचा पगार आणि इतर खर्च भागवणे अशक्य झाल्यामुळे अत्यावश्यक दुकाने वगळता तब्बल 25 टक्के इतर दुकानदारांनी दुकानांना कायमस्वरूपी टाळे लावल्याचा दावा शाह यांनी केला आहे.

राज्याच्या नव्या नियमावलीप्रमाणे रोजची रुग्णसंख्या 200 रुग्णांहून कमी झाल्यानंतरच लेव्हल 1 किंवा 2मधील नियमांप्रमाणे शिथिलता मिळणार आहे. अव्यवहार्य नियम मुंबईसारख्या आर्थिक राजधानीला लागू करणे चुकीचे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. याउलट लसींचा तुटवडा असल्याने मुंबईत 80 ते 100 टक्के लसीकरण लवकर होणे शक्य नाही.

परिणामी, सातत्याने दुकाने बंद ठेवल्याने व्यापार्‍यांची बचत संपली असून ते सहकुटुंब कर्जाची खाईत लोटले गेले आहेत. या बिकट परिस्थितीत राज्य शासन किंवा महापालिका प्रशासनाकडून कुठलीही कर सवलत किंवा आर्थिक मदत व्यापारी किंवा कामगारांना मिळालेली नाही. त्यामुळे येत्या सात दिवसांत राज्य शासनाने वेळेची मर्यादा वाढवली नाही किंवा पॅकेजची घोषणा केली नाही, तर राज्यातील व्यापारी तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा संघटनेने दिला आहे.

देशातील महत्त्वाच्या शहरांमधील व्यापार व दुकाने रात्री 9 वाजेपर्यंत खुली ठेवली जात आहेत. अशा परिस्थितीत मुंबईबाबत दुजाभाव का केला जात आहे, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.

वीकेन्डला दुकाने बंद असताना पर्यटनस्थळांवर मात्र तुफान गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे वीकेन्ड लॉकडाऊनला तर व्यापारी व दुकानदारांनी कडाडून विरोध केला आहे. दुकानांना व्यवसाय करण्यास वेळ वाढवावी, याबाबत सातत्याने सरकार व सरकारमधील राजकीय पक्षांना निवेदन देण्यात आले आहे.

* राज्यात सुमारे 13 लाख दुकाने आहेत. 4 एप्रिल ते 31 मे या काळात विविध जिल्ह्यांत वेगवेगळे निर्बंध लादल्यामुळे व्यापार्‍यांचे सुमारे 70 हजार कोटींचे नुकसान झाले. या काळात मुंबईत सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत दुकाने खुली होती. त्यानंतर 6 जूनपासून वीकेन्ड लॉकडाऊन व आठवड्यातील पाच दिवस सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत दुकाने खुली ठेवली जात आहेत. राज्यातील व्यापार्‍यांंना जूनपासून दररोज 650 कोटींचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांत नुकसानीत 30 हजार कोटींची भर पडली आहे.

* ग्राहकांनी दक्षिण व मध्य मुंबईतील प्रमुख बाजारपेठांकडे पाठ फिरवली आहे. मुळात सकाळपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत ग्राहकही खरेदीसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत नाही. त्यामुळे सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत मोजकेच ग्राहक खरेदी करत आहेत. याउलट मोठ्या संख्येने सायंकाळी 5 ते 8 या वेळेत ग्राहकी असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. परिणामी, या कालावधीत दुकाने खुली ठेवण्याची परवानगी देण्याची गरज संघटनेने व्यक्त केली आहे.

Back to top button