न्या. रमेश धनुका ठरणार तीन दिवसांचेच मुख्य न्यायाधीश | पुढारी

न्या. रमेश धनुका ठरणार तीन दिवसांचेच मुख्य न्यायाधीश

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती रमेश धनुका यांची, तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती गंगापूरवाला यांची मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी नियुक्तीची अधिसूचना जारी केली असून न्यायमूर्ती धनुका रविवार दि. २८ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आणि न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला मद्रास न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून गोपनीयतेची शपथ घेतील. विशेष म्हणजे येत्या ३० मे रोजी न्यायमूर्ती धनुका निवृत्त होत असल्याने केवळ तीन दिवसांचा कालावधी त्यांना मुख्य न्यायमूर्ती म्हणून मिळणार असला तरी मुंबई उच्च न्यायालयाला सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने केवळ सोमवार-मंगळवार असे दोनच कामाचे दिवस ते कार्यरत असतील.

मुंबई उच्च न्यायालयातील सेवाज्येष्ठतेत सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेले न्यायमूर्ती धनुका हे कार्यरत असलेल्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्त झालेले चौथे न्यायमूर्ती आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती सुजाता मनोहर, न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून असताना अथवा सेवाज्येष्ठतेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यायमूर्तीच्या निवृत्तीला वर्षभराहून कमी कालावधी शिल्लक असल्यास अशा न्यायमूर्तीची कार्यरत असलेल्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची तरतूद आहे. त्यानुसार न्यायमूर्ती धनुका यांची मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्तीची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने १९ एप्रिल रोजी केली होती.

Back to top button