यंदा पावसाळ्यात 25 दिवस समुद्राला मोठे उधाण! | पुढारी

यंदा पावसाळ्यात 25 दिवस समुद्राला मोठे उधाण!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत अरबी समुद्राला तब्बल 25 दिवस मोठे उधाण आहे. यावेळी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस पडला, तर शहर व उपनगरांत मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे चार महिने समुद्राला मोठे उधाण असते. यावेळी ऑगस्टमध्ये सर्वाधिक आठ दिवस समुद्राला मोठी भरती असणार आहे. जून महिन्यात पाच दिवस, ऑक्टोबर महिन्यात सहा दिवस समुद्राला उधाण राहणार आहे. सर्वाधिक 4.88 मीटर उंचीच्या लाटा 1 सप्टेंबरला उसळणार आहेत व 4 ऑगस्टला 4.87 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. समुद्राला मोठी भरती असताना शहरात तासाभरात 50 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे पावसाळ्यातील 25 दिवस पालिकेसाठी मोठी परीक्षा आहे.

मुंबईत तुंबणारे पाणी लक्षात घेऊन पालिकेने विविध ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप बसवण्याचा निर्णय घेतला आहे. भरतीच्या वेळी मुंबईत मुसळधार पाऊस झाला, तर समुद्रात पाणी फेकणारे हाजीअली इर्ला, ब्रिटानिया, गझदर बंद येथील शक्तिशाली पंप पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. अग्निशमन दल व अन्य यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत.

Back to top button