राज्यातील शाळा 15 जून; विदर्भातील शाळा 30 जूनपासून सुरू | पुढारी

राज्यातील शाळा 15 जून; विदर्भातील शाळा 30 जूनपासून सुरू

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात आता दरवर्षी 15 जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होईल; तर विदर्भात उन्हामुळे 30 जून रोजी शाळा सुरू केल्या जातील, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी दिली. राज्यातील शैक्षणिक वर्षात एकवाक्यता यावी तसेच मुलांना आपल्या सुट्ट्या व्यवस्थित प्लॅन करता याव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही केसरकर यांनी सांगितले. दरम्यान, कागद महागल्याने बालभारतीच्या पुस्तकांच्या किमतीही 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

मंत्री केसरकर यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. राज्यात विदर्भ वगळता उर्वरित भागात 15 जून रोजी शाळा सुरू होतील. तर विदर्भात 30 जूनला शाळा सुरू केल्या जातील. मात्र, या दिवशी रविवार आल्यास त्यानंतरच्या सोमवारी शालेय वर्षाला सुरूवात करण्यात येईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने
आपल्या 3 मार्चच्या पत्रकानुसार विदर्भात 26 जूनपासून तर उर्वरित महाराष्ट्रात 12 जूनपासून शाळा सुरू करण्याचा पत्रक काढले होते. मात्र, शिक्षक संघटना आणि शिक्षक आमदारांनी 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा आग्रह धरला. विद्यार्थ्यांना शाळेसाठी अतिरिक्त तीन दिवस मिळणार असतानाही शिक्षक संघटनांची मागणी मान्य केल्याने 15 पासून सुरू केल्या जात आहेत, अशी चर्चा आता रंगली आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सुट्टीत एकवाक्यता, सुसंगती राहावी यासाठी मागील वर्षी 11 एप्रिल 2022 रोजी शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार जून महिन्यातील चौथ्या सोमवारी विदर्भातील आणि दुसर्‍या सोमवारी उर्वरित महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या जीआरला पहिल्याच वर्षी शालेय शिक्षण विभागाने हरताळ फासत निर्णय बदलला आहे.

दप्तरांचे ओझे कमी होणार

दरम्यान, येत्या शैक्षणिक वर्षापासून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या सर्व सर्व विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश, वह्या, शूज व सॉक्स हे शासनातर्फे मोफत दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येक धड्यानंतर वहीचे एक पान जोडले जाणार आहे. त्यामुळे मुलांच्या दप्तराचे ओझेही कमी होणार असल्याचे मंत्री केसरकरांनी सांगितले.

बालभारती दरात वाढ

बालभारती पुस्तक आम्ही 90 टक्के मुलांना मोफत पुस्तक देत आहोत. पण, कागदाच्या किमती वाढत असल्याने 30 टक्के वाढ करण्यात आली आहे, असे मंत्री केसरकरांनी सांगितले. शिवाय श्रीमंतांना मोफत पुस्तके देता येणार नसल्याचेही स्पष्ट केले.

बारावीच्या परीक्षा होणार नाही ही अफवाच

पुढील वर्षापासून दहावी, बारावीच्या परीक्षा होणार नाहीत, ही अफवाच आहे. असा कोणताच निर्णय झालेला नाही. उलट दहावी-बारावी प्रमाणे इयत्ता आठवीच्या परीक्षा घेण्याचा आमचा मानस असल्याचे मंत्री केसरकरांनी सांगितले.

Back to top button