मुंबईचे रणांगण : २२७ प्रभाग भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पथ्यावर! | पुढारी

मुंबईचे रणांगण : २२७ प्रभाग भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पथ्यावर!

मुंबई : राजेश सावंत : मुंबई शहरातील प्रभागांची हद्द निश्चित करण्यासह प्रभागांची संख्या २३६ करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील तत्कालीन सत्ताधारी शिवसेनेने स्वतःला झुकते माप दिले होते. या निर्णयामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांचे संख्याबळ वाढून अन्य पक्षाला त्याचा फटका बसण्याची शक्यता होती. मात्र सोमवारी मुंबईतील प्रभागांची संख्या २२७ ठेवण्याचा निर्णय हायकोर्टाने दिल्यामुळे याचा सर्वाधिक फटका आता उद्धव ठाकरे सेनेला बसणार आहे. तर दुसरीकडे हा निर्णय भाजपासाठीच नाहीतर काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना फायदेशीर ठरणार आहे.

मुंबई शहरातील प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ करण्याचा निर्णय राज्यातील शिवसेना महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. त्यानुसार प्रभाग हद्द निश्चित करण्यासह आरक्षण सोडतही काढण्यात आली होती.

वाढलेल्या ९ प्रभागांत आपले नगरसेवक निवडून येण्यासाठी ठाकरे गटाने सोयीनुसार प्रभाग हद्द निश्चित करण्यासाठी हस्तक्षेप केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. एवढेच नाही तर प्रभाग हद्द निश्चित करताना सर्वच प्रभागांची छेडछाड करण्यात आली होती. ठाकरे गटाचे मतदार कोणत्या भागात आहेत, त्यानुसार प्रभागांचे दोन ते तीन भागांत तुकडे करण्यात आल्याचा आरोपही भाजपानेच नाही तर, ठाकरे गटाचा मित्र पक्ष काँग्रेस- नेही केला होता.

२०१७ नुसारच प्रभाग हद्द राहणार!

मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये निश्चित झालेल्या २२७ प्रभागांची हद्द यापुढेही जैसे थे राहणार आहे. त्यामुळे विद्यमान माजी नगरसेवकांना त्याचा सर्वांधिक फायदा होणार आहे.

मुंबई महानकरपालिका सार्वत्रिक निवडणुकासाठी ओबीसी आरक्षणासह काढण्यात आलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीत दिग्गज माजी नगरसेवकांसह सर्वच राजकीय पक्षांच्या ४० पेक्षा जास्त माजी नगरसेवकांनी आपले प्रभाग गमावले होते. पण २२७ प्रभाग जैसे थे राहणार असल्यामुळे या माजी नगरसेवकांना पुन्हा नगरसेवक बनण्याची संधी चालून आली आहे.

आरक्षण जैसे थे ठेवणार!

प्रभाग आरक्षण दर दहा वर्षांनी काढावे, असा ठराव मुंबई महापालिकेत मंजूर झाला होता. हा ठराव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. याचा आधार घेत राज्य सरकार प्रत्येक दहा वर्षांनी प्रभाग आरक्षण काढण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१७ प्रमाणेच २२७ प्रभागांमध्ये आरक्षण राहील असे सांगण्यात येत आहे.

ठाकरे गटासाठी डोकेदुखी

शिवसेनेचे किमान दोन डझन नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. यातील अर्धा डझनपेक्षा जास्त नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेशही केला आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी ही मोठी डोकेदुखी आहे. मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिव- सेनेचे ८४ तर भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेच्या निवडून आलेल्या ८४ नगरसेवकांपैकी काही नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्यामुळे त्या प्रभागात नगरसेवक निवडून आणण्यासाठी ठाकरे गटाला मोठी मोर्चेबांधणी करावी लागेल.

Back to top button