अजित पवारांचं नेमकं चाललंय काय?, एका पहाटेचा उधळलेला डाव पुन्हा मांडू शकतात | पुढारी

अजित पवारांचं नेमकं चाललंय काय?, एका पहाटेचा उधळलेला डाव पुन्हा मांडू शकतात

मुंबई ; गौरीशंकर घाळे : विरोधी पक्षनेते अजित पवारांचे नेमके काय सुरू आहे असा प्रश्न एकाचवेळी राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेनेलाही पडला आहे. याचे उत्तर अद्याप तरी कुणाकडे नाही. ते भाजपच्या जवळ जवळ पोहोचले आहेत, असे सतत म्हटले जाते. मात्र, कुणालाच काही माहीत नाही.

अजित पवारांचे गॉडफादर काका व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, मला माहीत नाही, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मला माहीत नाही. भाजपचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, गनिमी कावा असेल पण मला माहीत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक मंत्री उदय सामंत यांनाही अजित पवारांच्या हालचालींवर संशय आहे. पण, काय सुरू आहे हे त्यांनाही माहीत नाही. अजित पवारांचे काहीतरी सुरू आहे, या निष्कर्षावर मात्र सर्वांचे एकमत दिसते.

एप्रिलच्या उत्तरार्धात किंवा मे महिन्याच्या पूर्वार्धात सत्तासंघर्षाचा निकाल लागेल. या निकालानंतर महाराष्ट्राची सत्तेची घडी आहे तशी राहणार नाही. बदलत्या परिस्थितीत अजित पवार एका पहाटे उधळलेला डाव पुन्हा मांडू शकतात, असे अंदाज बांधले जात आहेत. अजित पवार भाजपमध्ये जाणार, असे ठाम विधान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. गुरुवारी दुसऱ्याच दिवशी सर्वांच्याच प्रतिक्रिया कानावर हात ठेवणाऱ्या होत्या.

उद्योग मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणाले की, अजित पवारांचे काहीतरी सुरू आहे. काय सुरू आहे मला माहिती नाही. ते कुठे जाणार, कुणाकडे जाणार याची मला कल्पना नाही. पण, काहीतरी सुरू आहे इतके मात्र मी सांगू शकतो. , त्यांचे सत्तासंघर्षाच्या निकालानंतर भाजपाला गरज पडल्यास राष्ट्रवादीचा एक मोठा गट फुटू शकतो, अशा अटकळी बांधल्या जात आहेत. राष्ट्रवादीत मोठा गट हा अजित पवारांचाच मानला जातो. मात्र, असे खरेच होणार आहे का, याची खातरजमा न करता मूळ शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीतून फुटू पाहणाऱ्या आमदारांना थेट इशाराच देऊन टाकला. कोणी आता आम्हाला सोडून गेले तर त्यांची ती राजकीय आत्महत्या ठरेल, असे ते म्हणाले.

भाजपचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर अजित पवारांचे काय, या प्रश्नावर गुगलीच टाकली. ते म्हणाले, असे काही होणार नाही, पण जेव्हा केव्हा काही घडेल ते माध्यमांना सांगून घडणार नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, इथे गनिमी काव्याने गोष्टी होतात.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून अजित पवार यांची माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. याबद्दल अन्य कुणीही माझ्याशी बोललेले नाही. पक्षात यादृष्टीने काही हालचाली चालू असतील तर मला त्याची कल्पना नाही.

Back to top button