सीबीएसईच्या पेपर पॅटर्नमध्ये बदल; यंदापासून परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित होणार | पुढारी

सीबीएसईच्या पेपर पॅटर्नमध्ये बदल; यंदापासून परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित होणार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : वर्ष 2023-24 च्या दहावी, बारावीच्या परीक्षेपासून सीबीएसई बोर्ड परीक्षा मूल्यांकन पद्धतीत बदल करणार असून विद्यार्थी क्षमतेवर आधारित प्रश्न विचारण्यात येतील. प्रश्नपत्रिकेतील लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचे महत्त्वही कमी केले जाणार असून सुमारे 50 टक्के प्रश्नपत्रिका ही बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुचविलेल्या शिफारशींच्या आधारे नवीन मूल्यांकन पद्धती विकसित करण्यात आली आहे.

येत्या शैक्षणिक वर्षातील परीक्षेत क्षमतेवर आधारित प्रश्न किंवा वास्तविक जीवनातील संकल्पनांचा वापर याचे मूल्यांकन करणारे प्रश्न परीक्षेत विचारण्यात येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशीनुसार मूल्यांकन पद्धती ठरविण्याच्याद़ृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे. हा बदल शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील परीक्षांपर्यंत मर्यादित असू शकतो.

त्यानंतर वर्ष 2024 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे. अभ्यासातील घोकंपट्टी कमी करून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि वैचारिक क्षमता वाढविण्यावर भर देण्यासाठी परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीबरोबरच सीबीएसई बोर्डाने नववी आणि अकरावीच्या परीक्षेतही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नववी आणि अकरावीच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर आधारित प्रश्न विचारण्यात येणार असून लघु आणि दीर्घ प्रकारच्या प्रश्नांचे महत्त्व कमी करण्यात येणार आहे. लघु आणि दीर्घ उत्तरांच्या एकत्रित प्रश्नांना 50 ऐवजी 40 टक्के गुण असतील, असे सीबीएसई बोर्डाने म्हटले आहे.

Back to top button