राज्यघटना पायदळी तुडवणार्‍यांना आम्ही तुडवू : उद्धव ठाकरे | पुढारी

राज्यघटना पायदळी तुडवणार्‍यांना आम्ही तुडवू : उद्धव ठाकरे

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य आणि केंद्र सरकार राज्यघटना पायदळी तुडवत आहे. घटना पायदळी तुडवणार्‍यांना आम्हीही पायदळी तुडवू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे दिला. सध्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे. भाजपचे सरकार विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचे काम करत आहे. एवढेच नाही तर या सरकारला न्यायव्यवस्थेवरही नियंत्रण हवे आहे. म्हणून न्यायव्यवस्था कब्जात घेण्याचे प्रयत्न ते करत आहेत. भाजपमध्ये भ्रष्ट लोकांची भरती सुरू आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आता आपले नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी असे ठेवावे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांची राज्यातील पहिली संयुक्त सभा रविवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.

व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे सभेला गैरहजर राहिले. वज्रमूठ सभा नावाने झालेल्या या सभेस तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली.

मैदानावर उपस्थित जनसागराला उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या वर्षी 8 जूनला आलो तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. ज्या ज्या वेळी आलो त्यावेळी या मैदानावर मला गर्दीचा दुष्काळ कधी दिसलाच नाही. याच मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगरची घोषणा केली. याआधी भाजपसोबत आपली युती होती. गेली 25 वर्षे आपण वेगळ्या भ्रमात होतो. दोनवेळा युतीचे सरकार आले. पण औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर झाले नव्हते. म्हणून मविआच्या सहकार्‍यांना धन्यवाद देतोय, जे भाजपसोबत राहून जमले नाही ते आपण करून दाखवले आहे. याच गोष्टीवरून त्यांची वृत्ती कशी लक्षात येईल. निवडणुका आल्या की जातीय तेढ निर्माण करायचे. आता गौरव यात्रेचा उल्लेख झाला. जरूर काढा. हल्ली आणखी एक सुरू झालेय ते म्हणजे हिंदू जनआक्रोश. मुंबईत शिवसेना भवनपर्यंत मोर्चा आणला. आता हिंदुत्ववादी म्हणवून घेणार्‍या भाजपचे सरकार आहे. तरीदेखील या देशात हिंदूंना आक्रोश करावा लागतोय. मग यांची शक्ती काय कामाची? याआधी आम्ही कधीही हिंदूंना आक्रोश करायची वेळ येऊ दिली नाही.

मी हिंदुत्व सोडल्याचा आरोप होतो. मला तुम्ही तसे दाखवून द्या, मी घरी जाऊन बसेन, असे आव्हान देऊन ठाकरे म्हणाले, मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले असे म्हणता. मग तुम्ही मुफ्ती मोहम्मद आणि मेहबूबा मुफ्तीबरोबरच मांडीला मांडी लावून बसला होता तेव्हा काय झाले होते? माझा अमित शहांना प्रश्न आहे, तुम्ही मेघालयात संगमावर आरोप केले होते. आता त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले. सध्या देशातील सर्वात वाईट सरकार मेघालयात आहे. भ्रष्टाचार्‍यांना तुम्ही पक्षात घेत असला तर भारतीय जनता पार्टी हे नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी नाव ठेवा, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

माझ्या वडिलांचे नाव चोरण्याचा प्रयत्न

माझ्या पक्षाचे नाव, चिन्ह चोरले. माझ्या वडिलांचे नाव सुद्धा चोरण्याचा प्रयत्न सुरू आहे. अरे तुमच्या वडिलांना किती यातना होत असतील. पण तुम्हाला मी सांगतो, माझ्या वडिलांचे नाव चोरू देणार नाही. तुम्ही मोदींना घेऊन महाराष्ट्रात या, मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन मैदानात उतरतो, असे आव्हान देऊन ठाकरे यांनी तुम्ही आज दुसर्‍यांचे विचार वाचून दाखविता. पण उद्या ही जनता मतदानाला उतरेल तेव्हा तुम्हाला कुणी वाचवू शकणार नाही हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा : अजित पवार

आज तुम्ही सावरकर गौरवयात्रा काढता, जरूर काढा. पण तुमच्यात हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा, असे आव्हान यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप सरकारला दिले.

आधीच्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अवमान केला. त्यावेळी का नाही गौरवयात्रा काढल्या? असा सवाल करत पवार यांनी सत्ताधारी दुटप्पी राजकारण करत असल्याचा आरोप केला. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर केलेल्या टिपणीकडे लक्ष वेधत या सरकारला जनाची नाही, मनाची तरी लाज वाटायला पाहिजे, अशी टीका केली.

कितीही गौरव यात्रा काढा, फरक पडणार नाही : अशोक चव्हाण

कुणी कितीही गौरव यात्रा काढल्या तरी मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात फरक पडणार नाही हे आजच्या विराट सभेतून दिसते, असे सांगून काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, मविआची स्थिती देवगिरी किल्ल्यासारखी मजबूत झाली आहे. कितीही फोडण्याचा प्रयत्न केला तरी फरक पडणार नाही. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आधी एकत्र काम केले आहे. आमच्या मनामध्ये कधीही किंतू-परंतु नव्हते. पण शिवसेनेसोबत काम करायचा प्रस्ताव आला तेव्हा भाजपला रोखायचे असेल तर आघाडी झाली पाहिजे हे ठरले. छोटे छोटे मुद्दे बाजूला ठेवून सरकार स्थापन झाले. पण काही जणांनी आमदारांची फोडाफोडी केली. उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली आणि आमचे सरकार पडले. हे जनतेला चालणार आहे का ?

मविआ सरकारचा कालखंड ऐतिहासिक : बाळासाहेब थोरात

महाविकास आघाडी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केले. आमच्या सरकारचा अडीच वर्षांचा ऐतिहासिक कालखंड राहिला. शेतकर्‍यांना कर्जमाफी केली. महिनाभरात या निर्णयाची अंमलबजावणी केली. कोरोना संकट अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले. नंतर सरकार बदलले. आता हे सरकार कसे चाललेय हे वेगळे सांगायची गरज नाही. शेतीमालाला भाव नाही. जो कोणी सरकारविरोधात बोलेल, त्याच्या घरी ईडी जाते, आयकर खाते जाते. केंद्र आणि राज्य सरकारने अशी परिस्थिती निर्माण केली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

शेतकर्‍यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली : धनंजय मुंडे

मविआच्या सभेला हे सरकार घाबरले. म्हणून येथे यात्रा काढली जातेय. काल जनतेचा एप्रिल फूल दिवस साजरा झाला. हा चेष्टा दिवस भाजपचा वर्धापन दिन म्हणून साजरा झाला पाहिजे. कारण या सरकारचा अर्थसंकल्प नुकताच उपमुख्यमंत्र्यांनी मांडला. त्यात चेष्टेशिवाय काही नव्हते. या सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार आणि भाजपवर निशाणा साधला.

सभा होऊ नये यासाठी मिंधे सरकारचा प्रयत्न : खैरे

आजची ही सभा होऊ नये म्हणून मिंधे सरकारकडून खूप प्रयत्न झाले, असा आरोप करून ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी राजकारण केले. चुकून निवडून आलेले खासदार जलील यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहा-पंधरा दिवस उपोषणाला बसू दिले. पोलिसांनी कारवाई केली नाही. पोलिसांवर नागपूरवाल्यांचा दबाव होता. दुसरीकडे त्या विरोधात शहरात एक मोर्चा काढायला लावला. जाणूनबुजून हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडण लावायचे काम हे घटनाबाह्य सरकार करत आहे, असा आरोपही खैरे यांनी केला.

Back to top button