हरीश साळवे यांचेही नाव पँडोरा पेपर्समध्ये | पुढारी

हरीश साळवे यांचेही नाव पँडोरा पेपर्समध्ये

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : जगभरातील प्रभावशाली धनिकांनी ऑफशोअर कंपन्यांच्या माध्यमातून अमाप माया जमवून मायदेशातील कर बुडवल्याचे उघडकीस आणणारे ‘पँडोरा पेपर्स’ इंटरनॅशनल कन्सॉर्शियम ऑफ जर्नालिस्ट्स (आयसीजे) या संस्थेने प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली आहे.या बड्या हस्तींमध्ये भारतातील सुमारे 380 जण समाविष्ट असून, आता नामवंत कायदेतज्ज्ञ हरीश साळवे यांनी ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्समधील (बीव्हीआय) एका कंपनीच्या माध्यमातून लंडनमध्ये घर खरेदी केल्याचे समोर आले आहे.

साळवे यांनी लंडनमध्ये मालमत्ता खरेदी करण्यासाठी ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स येथील एक कंपनी 2015 मध्ये ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे.

बीव्हीआय येथे नोंदणी झालेल्या मार्सुल या कंपनीचे 50 हजार समभाग 15 सप्टेंबर 2015 रोजी हरीश साळवे यांना देण्यात आले. या कंपनीची प्रतिनिधी असलेल्या अल्कोगाल म्हणजे अ‍ॅलेमन, कॉर्डेरो, गॅलिंडो अँड ली ट्रस्ट (बीव्हीआय) लि. या संस्थेने तयार केलेल्या सदस्यांच्या (भागधारक) यादीत या व्यवहाराची नोंद आहे.

मार्सुल कंपनीचे संचालक तथा सेक्रेटरी या नात्याने लाभधारक म्हणून साळवेंची नोंद असल्याने ही कंपनी त्यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट होते.

साळवे काय म्हणतात?

मार्सुल कंपनी आपण स्थापन नव्हे, तर खरेदी केली होती. त्यासाठी कतारमध्ये मुख्यालय असलेल्या क्यूआयबी या बँकेकडून कर्ज घेतले होते. आपले खाते असलेल्या कूट्स बँकेने पुनर्वित्तपुरवठा केला होता, असे हरीश साळवे यांनी म्हटले आहे.

युनायटेड किंग्डममध्ये कंपनीद्वारे खरेदी केलेल्या मालमत्तेवर एटीईडी (अ‍ॅन्युअल टॅक्स ऑन एन्व्हलप्ड ड्वेलिंग्ज) कर भरावा लागतो. संबंधित मालमत्ता भाड्याने दिली जाईपर्यंत हा वार्षिक कर भरणे आवश्यक असते. लंडनमधील ते घर आता भाड्याने दिलेले आहे, अशी माहिती साळवे यांनी दिली.

Back to top button